मुंबई : प्राण्यांमधील लंपी त्वचा रोगाच्या पार्श्वभूमीवर मुंबईला नियंत्रीत क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे शहरात प्राण्यांची ने-आण करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच अशा प्राण्यांचा बाजार भरवणे, प्रदर्शन करणे यावरही बंदी आहे.राजस्थान, मध्यप्रदेशात लम्पी त्वचारोगामुळे शेकडो प्राण्याचा मृत्यू झाल्यामुळे आता गुरे तसेच गोजातीय प्रजातींमधील इतर सर्व प्राण्यांबाबत निर्बंध घालण्यात आले आहेत. गोठ्यापासून किंवा प्राणी पाळले जातात तेथून नियंत्रण क्षेत्रातील किंवा क्षेत्राबाहेरील अन्य कोणत्याही ठिकाणी ने-आण करण्यास मनाई करण्यात आली आहे.
लंपीमुळे गोजातीय प्रजातीचे जिवंत अथवा मृत प्राणी, कोणत्याही बाधित झालेल्या गोजातीय प्राण्यांच्या संपर्कात आलेली कोणत्याही प्रकारची वैरण, प्राण्यांच्या निवाऱ्यासाठी असलेले गवत किंवा अन्य साहित्य आणि अशा प्राण्यांचे शव, कातडी किंवा भाग किंवा अशा प्राण्यांपासून अन्य कोणतेही उत्पादन नियंत्रित क्षेत्रामधून ने आण करण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच गोजातीय प्रजातीच्या प्राण्यांचे बाजार भरवणे, जत्रा भरवणे, प्राण्यांचे प्रदर्शन आयोजित करणे यास मनाई करण्यात आली आहे. तसेच बाधित झालेल्या गोजातीय प्रजातींच्या प्राण्यांना आणणे किंवा आणण्याचा प्रयत्न करण्यास बंदी करण्यात आली आहे.
मुंबईत याबाबतचे आदेश १३ ऑक्टोबरपर्यंत लागू लागणार आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीला भारतीय दंड विधान संहिता १८६० चे कलम १८८ व प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम २००९ नुसार कारवाईस पात्र राहील. याबाबतचे आदेश मुंबई पोलिसांकडून सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी व तसेच पोलीस ठाण्यातील प्रभारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.