मुंबई : नवीन पिढीचे वाचन खूप कमी होत चालले आहे ही खंत व्यक्त करत नवीन पिढीत लेखनाची आणि वाचनाची आवड निर्माण व्हावी, जेणेकरून आपल्याला सृजनशील,नवनिर्मित लेखक, कवी मिळावेत, अशी आशा ज्येष्ठ हास्यकवी अशोक नायगावकर यांनी त्यांच्या पंच्याहत्तरीनिमित्त आयोजित सोहळय़ात व्यक्त केली.

विनोदी, तिरकस तसेच उपहासात्मक लिखाणासाठी ओळखल्या जाणाऱ्या अशोक नायगावकर यांच्या पंच्याहत्तरीनिमित्त गुरुवारी दादर- माटुंगा सांस्कृतिक केंद्रामध्ये ‘एका कलांदराची पंच्याहत्तरी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमादरम्यान ‘वाटेवरच्या कविता’, ‘कवितेच्या वाटेवर’ आणि ‘नायगावकर वगैरे वगैरे’ या पुस्तकांचा प्रकाशन सोहळा पार पडला. महेश केळुसकर, नीरजा, रामदास फुटाणे, श्रीकांत बोजेवार, अशोक बागवे, अरुण म्हात्रे, आशिष शेलार, सुदेश हिंगलासपूरकर, अरुण जोशी, दिनकर गांगल आदी मान्यवरांनी सोहळय़ाला उपस्थिती लावली. अशोक नायगावकर यांच्या वतीने मराठीतील सात साहित्य संस्थांना दिनकर गांगल यांच्या हस्ते धनादेश वाटप करण्यात आले.

‘मिशा हशा दाही दिशा’ अशा मोजक्या शब्दात भाजपचे नेते आशिष शेलार यांनी नायगावकर यांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. लतिका भानुशाली यांनी केले. ‘कवितेच्या वाटेवर’ या काव्यसंग्रहाच्या मुखपृष्ठ प्रभाकर वाईरकर तर ‘नायगावकर वगैरे वगैरे’चे मुखपृष्ठ निलेश जाधव यांनी तयार केले आहे. या कार्यक्रमात महेश केळुसकर, नीरजा, अशोक बागवे, अरुण म्हात्रे, सुदेश हिंगलासपूरकर आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत जुन्या आठवणींना उजाळा दिला.

अशोक नायगावकर यांनी त्यांच्या ‘वेड लागायच्या आधी’ आणि ‘ऑनरशिप जेल’ या दोन उपहासात्मक विनोदी कविता सादर करून वाढदिवसाचा केक कापत सोहळय़ाची सांगता केली.

Story img Loader