मुंबई : पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकलला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या लोकलमधून दररोज सुमारे १.५ लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करीत होते. मात्र, या लोकलमधून अनेक विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांमुळे तिकीटधारक प्रवाशांचा प्रवास गैरसोयीचा होतो. त्यामुळे पश्चिम रेल्वेकडून विशेष तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. नुकताच दोन दिवसीय तिकीट तपासणी मोहिमेत पश्चिम रेल्वेने विनातिकीट प्रवास करणाऱ्या १,२७३ प्रवाशांची धरपकड करून चार लाख रुपये दंड वसूल केला.
पश्चिम रेल्वेवर सध्या ७९ वातानुकूलित लोकल धावत आहेत. गर्दीमुक्त आणि थंडगार प्रवास व्हावा यासाठी मुंबईकर वातानुकूलित लोकलचे तिकीट काढून प्रवास करतात. मात्र, वातानुकूलित लोकलमध्ये विनातिकीट प्रवासी किंवा सामान्य लोकलच्या तिकिटवर प्रवासी प्रवास करतात. अशा प्रवाशांना रोखण्यासाठी पश्चिम रेल्वेने नुकताच वातानुकूलित लोकलमध्ये दोन दिवसीय विशेष तिकीट तपासणी मोहीम राबवली. विशेष तपासणी सकाळ आणि सायंकाळी गर्दीच्या वेळी राबवण्यात आली. या मोहिमेत विनातिकीट प्रवास करणाऱ्या १,२७३ जणांची धरपकड करून चार लाख रुपये दंड वसूल करण्यात आला. यावेळी वाणिज्य विभाग आणि रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी तैनात होते.
हेही वाचा – समाजमाध्यमांवरून धडे घेऊन दुचाकी चोरणारा अटकेत
हेही वाचा – मुंबई : शिक्षकाकडून सात वर्षांच्या मुलीचा विनयभंग, धार्मिक शिक्षण संस्थेत घडला प्रकार
प्रवाशांनी योग्य तिकीट काढून प्रवास करावा आणि विनातिकीट प्रवाशांना पकडण्यासाठी नियमित सखोल तिकीट तपासणी करण्यात येणार आहे. यासह विशेष तिकीट तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. प्रवाशांनी तिकीट खिडकी, एटीव्हीएम मशीन किंवा यूटीएस ॲपद्वारे ऑनलाइन तिकीट खरेदी करावे, असे आवाहन पश्चिम रेल्वेकडून करण्यात आले आहे.