लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाशी संबंधित प्रमुख ठिकाणांना आणि बौद्ध समुदायाशी संबंधित ठिकाणांना भेटी देण्यासाठी भारतभर रेल्वे प्रवास करता येणार आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हा दौरा इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने (आयआरसीटीसी) नियोजित केला आहे. आयआरसीटीसीद्वारे मुंबई, पुणे, नागपूर, महू येथे ‘भारत गौरव टुरिस्ट ट्रेन’ ही विशेष रेल्वेगाडी चालवण्यात येईल.
आयआरसीटीसीने भारत गौरव टुरिझम ट्रेनद्वारे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यात्रा’ सुरू केली आहे. या सहलीची सुरुवात २९ एप्रिल रोजी होईल. ही विशेष रेल्वेगाडी ७ रात्री आणि ८ दिवसांचा प्रवास करेल. पुण्यातील दापोडी विहार, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय, मुंबई येथील राजगृह, चैत्यभूमी, सिद्धार्थ महाविद्यालय येथे भेट दिल्यानंतर मध्यप्रदेशमधील महू, दिल्ली येथील डाॅ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, इंडिया गेट, लोटस टेंपल, कुतुबमिनार, नागपूर येथील दीक्षाभूमी, नागालोक ही ठिकाणे समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यानंतर परतीचा प्रवास सुरू होईल. हा दौरा ५ मेपर्यंत असेल. ही सहल शयनयान श्रेणीतून प्रवास करणाऱ्यांसाठी १४,९९० रुपयांपासून तर तृतीय वातानुकूलित श्रेणीसाठी २८,४२० रुपये, द्वितीय वातानुकूलित श्रेणीमधून प्रवास करणाऱ्यांसाठी ३५,२३० रुपये अशी आहे. यावेळी राहण्याची आणि जेवण्याची सोय केली जाईल, असे आयआरसीटीसीकडून सांगण्यात आले.
गेल्या २५ वर्षांपासून इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) द्वारे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय ठिकाणांचे दौरे आखत आहे. रेल्वे मंत्रालयाच्या भारत गौरव धोरणात किफायतशीर आणि परवडणाऱ्या सहली उपलब्ध करून देण्यासाठी विशेष नियोजन केले जाते.
आयआरसीटीसीने या दौऱ्यानिमित्त पर्यटकांसाठी त्यांच्या विशेष आणि पूर्णपणे तृतीय श्रेणी वातानुकूलित टूर ट्रेनची व्यवस्था केली आहे. या ट्रेनमध्ये आधुनिक स्वयंपाकघर, उत्तम आसन व्यवस्था अशा सुविधा प्रदान केल्या आहेत. या ट्रेनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असणार आहे. तसेच या रेल्वेगाडीमध्ये एकूण ६६२ पर्यटकांना सामावून घेता येईल. आयआरसीटीसी टूर दरम्यान पर्यटकांना सुरक्षित आणि निरोगी प्रवास प्रदान करून सर्व आवश्यक आरोग्य खबरदारीचे उपाय देखील घेणार आहे.
तसेच हाॅटेलमध्ये राहण्याची व्यवस्था, सकाळचा चहा, नाश्ता, दुपारचे जेवण, चहा/कॉफी आणि रात्रीचे जेवण याची व्यवस्था केली आहे. तसेच पर्यटकांना पर्यटनस्थळी जाण्यासाठी वातानुकूलित, विनावातानुकूलित वाहनांची व्यवस्था असेल. तसेच पर्यटकांना आयआरसीटीसीच्या संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाइन आरक्षण करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे, अशी माहिती आयआरसीटीसीद्वारे देण्यात आली.
पर्यटक या रेल्वेगाडीतून नागपूर, वर्धा, पुलगाव, बडनेरा, अकोला, जळगाव, नाशिक, कल्याण रेल्वे स्थानकावरून देखील प्रवास करू शकतात. हा दौरा २९ एप्रिल २०२५ रोजी सुरू होईल. ही विशेष रेल्वेगाडी ७ रात्री ८ दिवसांच्या सहलीवर घेऊन जाईल. ज्यामध्ये जेवण, निवासस्थानापासून ते हस्तांतरणापर्यंत सर्व सेवांचा समावेश आहे. किंमतीमध्ये आधीच जीएसटी समाविष्ट आहे. त्यामुळे प्रवाशांना अतिरिक्त शुल्क भरण्याची आवश्यकता नसेल.