मुंबई : विदर्भ, खानदेश, कोकण, गोवा यांना जोडणाऱ्या नागपूर – मडगाव विशेष रेल्वेगाडीच्या सेवेत वाढ करण्यात आली आहे. या विशेष रेल्वेगाडीची सेवा १ जानेवारीपासून पुढील सूचना मिळेपर्यंत सुरू राहणार आहे. तर, या रेल्वेगाडीला सावंतवाडी रोड येथे अतिरिक्त थांबा देण्याचा निर्णय रेल्वे मंडळाने घेतल्याने हजारो कोकणवासी प्रवाशांना दिलासा मिळेल.
नागपूर – मडगाव विशेष रेल्वेगाडी विदर्भ, खानदेश, मुंबई महानगर आणि कोकण पट्ट्यातून धावत असल्याने ती प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. या मार्गात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी विभाजित करण्यासाठी कोकण आणि मध्य रेल्वे प्रशासनाकडून या रेल्वेगाडीच्या सेवेत वाढ केली जाते. आता १ जानेवारीपासून पुढील सूचना मिळेपर्यंत या रेल्वेगाडीची सेवा सुरूच राहणार आहे. त्यामुळे प्रवाशांना याचा मोठा दिलासा मिळेल.
हेही वाचा >>> बोरिवली, भायखळ्यातील सर्व बांधकामे बंद; प्रदूषण नियंत्रणासाठी मुंबई महापालिकेचा कठोर निर्णय, पालिका आयुक्तांची घोषणा
कोकण आणि मध्य रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन गेल्या दोन वर्षांपासून गाडी क्रमांक ०११३९ नागपूर – मडगाव आणि गाडी क्रमांक ०११४० मडगाव – नागपूर रेल्वेगाडीच्या सेवेत वाढ केली आहे. परंतु, या रेल्वेगाडीला कायमस्वरूपी वेळापत्रकात समाविष्ट न करता गेल्या दोन वर्षात दर दोन ते तीन महिन्यांत या रेल्वेगाडीची सेवा वाढवण्यात आली आहे. ही रेल्वेगाडी विशेष रेल्वेगाडी म्हणून धावत असल्याने प्रवाशांना तिकिटांसाठी जादा पैसे मोजावे लागतात. या रेल्वेगाडीला प्रवाशांचा प्रतिसाद मिळत असून ही रेल्वेगाडी नागपूर – मडगाव या पट्ट्यातील अनेक महत्त्वाच्या ठिकाणांशी जोडली आहे. मात्र रेल्वे प्रशासन या रेल्वेगाडीला कायमस्वरूपी वेळापत्रकानुसार का चालवत नाही, असा प्रश्न प्रवाशांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा >>> मध्य आणि पश्चिम रेल्वे स्थानकांवर सरकते जिने, उद्वाहन उभारणार
गाडी क्रमांक ०११३९ नागपूर – मडगाव द्वि-साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी १ जानेवारीपासून दर बुधवारी आणि शनिवारी दुपारी नागपूरवरून धावेल. तर, गाडी क्रमांक ०११४० मडगाव – नागपूर द्वि-साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी २ जानेवारीपासून गुरुवारी आणि रविवारी मडगाववरून धावेल. दोन्ही दिशेकडील रेल्वेगाडी वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, कणकवली, कुडाळ, थिवि आणि करमळी येथे थांबेल. तर, रेल्वे मंडळाने या रेल्वेगाडीला नुकताच सावंतवाडी रोड येथे थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नागपूर-मडगाव रेल्वेगाडी १ जानेवारीपासून दुपारी १२.५६ वाजता आणि मडगाव-नागपूर रेल्वेगाडी २ जानेवारीपासून रात्री ९.४८ वाजता सावंतवाडी रोड येथे थांबेल. या रेल्वेगाडीला एकूण २४ डबे असतील. द्वितीय श्रेणी वातानुकूलित डबा एक, तृतीय श्रेणी वातानुकूलित डबा ५, शयनयान ११, सामान्य ५, एसएलआर २ डबे अशी डब्यांची संरचना असेल.