घुमान येथे होणाऱ्या ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी मुंबईहून सोडलेल्या विशेष रेल्वेतून साहित्यिकांची स्वारी निघाली खरी पण मुहूर्तापासूनच दोन तासांनी वेळ चुकलेली ही रेल्वे पुणेमार्गे थांबत थांबत बुधवारी रात्रीपर्यंत केवळ मनमाडपर्यंतचा टप्पा गाठू शकली. त्यामुळे आता ‘संमेलन संपायच्या आत तरी आपण पंजाबमध्ये पोहोचू दे’ असा धावा करण्याची वेळ या गाडीतून प्रवास करत असलेल्या साहित्यिक-रसिकांवर आली आहे.
घुमानमध्ये ३ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या साहित्य संमेलनाला हजर राहू इच्छिणाऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून ३१ मार्चला रात्री साडेबारा वाजता ‘श्री गुरूनानक देवजी’ ही विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय झाला. तीन दिवसांचे संमेलन आणि त्याआधी तिथे पोहोचेपर्यंतचा दोन दिवसांचा प्रवास लक्षात घेऊन सामानसुमान बांधून सीएसटी स्थानकात पोहोचलेल्या साहित्य रसिकांना या गाडीसाठी तब्बल दोन तास वाट पाहत बसावे लागले. या गाडीला मंत्र्यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्याचा आयोजकांचा बेत होता. त्यानुसार, संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट हे रात्री सव्वाअकरा वाजल्यापासून स्थानकात उपस्थित होते. मात्र, दीड वाजले तरी गाडीचा पत्ता नसल्यामुळे घुमानवारीला निघालेल्या लोकांनाच हिरवा झेंडा दाखवून आणि प्रवासासाठीच्या शुभेच्छा देऊन ते निघून गेले. अखेर, मध्यरात्री अडीच वाजता स्थानकावर आलेल्या खास ट्रेनमधून ही मंडळी रवाना झाली.
पंजाबमध्ये पोहोचायला दोन दिवस लागतात. त्यामुळे गाडीची तपासणी, व्यवस्था या सगळ्यांमुळे उशीर होत असल्याचे कारण प्रवाशांना देण्यात आले. मात्र, एवढी तयार होऊन आलेली गाडी आतून अत्यंत अस्वच्छ असल्याचे प्रवाशांना आढळून आले. त्यात गाडीमधील दिवे, पंखे यांचीही दुरूस्ती झालेली नसल्याने मध्येच काहीवेळ पूर्ण काळोखात प्रवास करावा लागत आहे. शिवाय, ही गाडी नेहमीच्या वेळापत्रकातील लांब पल्ल्यांची गाडी नसल्याने अन्य गाडय़ांना त्यांच्या वेळेप्रमाणे पुढे काढण्यासाठी प्रत्येक ठिकाणी थांबे घेत या गाडीचा प्रवास सुरू असल्याने दोन दिवसांचा हा प्रवास आणखी किती तास लांबणार?, अशी चिंता प्रवाशांना सतावते आहे. मुंबईहून अडीच वाजता सुटलेल्या गाडीला पुणे गाठायला तब्बल सात तास लागले आहेत. ही गाडी २ एप्रिलला संध्याकाळी पंजाबमध्ये पोहोचेल, अशी अपेक्षा होती. मात्र, बुधवारी आठच्या सुमारास गाडी कशीबशी मनमाड स्थानकात पोहोचली होती. आत्ताच्या या वेगाने ही गाडी संमेलनाच्या दिवशी तरी पोहोचेल की नाही?, अशी धास्ती प्रवाशांना वाटते आहे. शिवाय, मराठी साहित्य परिषदेचा एकही सदस्य या गाडीने प्रवास करत नसून सारी मदार स्वयंसेवक म्हणून काम करणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर सोपवण्यात आली असल्याने ‘घुमान’ सवारीचा पुरता बोजवारा उडाला आहे. या सगळ्या परिस्थितीत घुमून घुमून का होईना संमेलन संपायच्या आत तरी गाडी पंजाबमध्ये पोहोचू दे.. असा धावा करत या साहित्य रसिकांचा प्रवास सुरू आहे.
संमेलन ‘घुमान’, जाऊ या दमानं..
घुमान येथे होणाऱ्या ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी मुंबईहून सोडलेल्या विशेष रेल्वेतून साहित्यिकांची स्वारी निघाली खरी पण मुहूर्तापासूनच दोन तासांनी वेळ चुकलेली ही रेल्वे पुणेमार्गे थांबत थांबत बुधवारी रात्रीपर्यंत केवळ मनमाडपर्यंतचा टप्पा गाठू शकली.
First published on: 02-04-2015 at 03:00 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Special train to ghuman sahitya sammelan