मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा विभागातील वाहन चालकांना वाहन चालवण्याचे विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. घन कचऱ्याची वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांना सुरक्षितपणे वाहन चालविण्याचे योग्य तंत्रज्ञान अवगत करून देणे, वाहतुकीचे नियम पाळण्याचे महत्त्व समजावणे, वाहनांची योग्य काळजी घेणे आदींबाबत या प्रशिक्षणात सविस्तर माहिती देण्यात येणार आहे.
कुर्ला येथील बेस्ट बसच्या दुर्घटनेनंतर चालकांच्या प्रशिक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला होता. कुर्ला दुर्घटनेतील चालकाला इलेक्ट्रिक बस चालवण्याचे पुरेसे प्रशिक्षण दिलेच नव्हते असे आढळून आले होते. त्यामुळे पालिकेच्या घनकचरा विभागाने आपल्या चालकांनाही प्रशिक्षण देण्याचे ठरवले आहे. कचरा गाड्यांवरील चालकांबरोबरच अधिकाऱ्यांच्या गाडयांच्या चालकांनाही हे प्रशिक्षण दिले जाणार आहे.याच कार्यक्रमांतर्गत रक्षात्मक चालक प्रशिक्षण (Defensive Driving Training) देण्यात येणार आहे. त्याच्या पहिल्या टप्प्यात २४० चालकांचा समावेश करण्यात आला आहे. पैकी ४० जणांना गेल्या दोन दिवसात एक दिवसीय प्रशिक्षण देण्यात आले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका आणि राष्ट्रीय सुरक्षा परिषद (महाराष्ट्र विभाग) यांच्याकडून हे प्रशिक्षण देण्यात आले.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतून दररोज घनकचरा संकलित केला जातो. हा कचरा संकलित करुन वाहनांमधून वाहून नेताना महानगरपालिकेकडून विविध प्रकारची काळजी घेतली जाते. तसेच या वाहन चालकांनाही वेळोवेळी प्रशिक्षण दिले जाते. त्याचाच एक भाग म्हणून घन कचऱ्याची वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांना सुरक्षितपणे वाहन चालविण्याचे योग्य तंत्रज्ञान अवगत करून देणे, वाहतुकीचे नियम पाळण्याचे महत्त्व समजावणे, वाहनांची योग्य काळजी घेणे आदींबाबत या प्रशिक्षणात सविस्तर माहिती देण्यात आली.
या प्रशिक्षण कार्यक्रमांच्या पहिल्या टप्प्यात एकूण २४० वाहन चालकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याची सुरूवात गुरुवारी २० मार्च रोजी झाली. हे एकदिवसीय प्रशिक्षण चर्चगेट परिसरातील इंडियन मर्चंटस् चेंबर येथे झाले. दर आठवड्यात गुरुवार व शुक्रवार याप्रमाणे बारा तुकड्यांमध्ये प्रत्येकी २० चालक याप्रमाणे पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण दिले जाणार आहे. मुंबई महापालिकेच्या घनकचरा विभागांतर्गत परिवहन विभाग येतो. या विभागाकडे मुंबई महापालिकेच्या विविध वाहनांची देखभाल करण्याची जबाबदारी आहे. या विभागात सुमारे ७०० विविध गाड्या आहेत. यात कचरा वाहून नेणारे डंपर, कॉम्पॅक्टर यांचा समावेश आहे. तसेच पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या विविध ४०० गाड्या आहेत. या सर्व वाहनचालकांना हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच कंत्राटदारांच्या गाड्यांवरील चालकांनाही हे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
अनेकदा कचरा गाड्यांवरील वाहनचालक हे देखील बेदरकारपणे वाहन चालवतात, कधी मार्गिका बदलतात. त्यामुळे भविष्यात अपघात घडू नये म्हणून या चालकांना हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याचबरोबर या वाहनचालकांना वाहतूकीच्या नियमांबाबत, पादचाऱ्यांच्या हक्काबाबत जागृत करणे, त्यांना स्वच्छतेचे, शिस्तीचे धडे देणे हा देखील या प्रशिक्षणाचा भाग असल्याची माहिती घनकचरा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.