लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : होळीनिमित्त कोकणवासीय आपल्या मूळगावी जाण्याच्या तयारीत असून रेल्वे तिकीट आरक्षित करण्यासाठी लगबग सुरू आहे. कोकणात जाणाऱ्यांची संख्या लक्षात घेऊन मध्य व कोकण रेल्वे मार्गावरून विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचे नियोजन केले आहे.
होळीनिमित्त मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वेच्या समन्वयाने सीएसएमटी – मडगाव, एलटीटी – मडगाव अशा रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहेत. कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक ०११५१ सीएसएमटी – मडगाव विशेष रेल्वेगाडी सीएसएमटीवरून ६ मार्च, १३ मार्च रोजी मध्यरात्री १२.२० वाजता सोडण्यात येणार आहे. ही रेल्वेगाडी अनुक्रमे ७, १४ मार्च रोजी दुपारी १.३० वाजता मडगाव येथे पोहोचेल. गाडी क्रमांक ०११५२ मडगाव – सीएसएमटी विशेष रेल्वेगाडी मडगाव येथून ६ मार्च, १३ मार्च रोजी दुपारी २.१५ वाजता सोडण्यात येणार असून ही रेल्वेगाडी त्याच दिवशी मध्यरात्री ३.४५ वाजता सीएसएमटीला पोहोचेल.
गाडी क्रमांक ०११२९ लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव १३ मार्च, २० मार्च रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रात्री १०.१५ वाजता सुटेल. ही रेल्वे अनुक्रमे १४ मार्च आणि २१ मार्च रोजी दुपारी १२.४५ वाजता मडगाव येथे पोहोचेल. गाडी क्रमांक ०११३० मडगाव- लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष रेल्वेगाडी १४ मार्च, २१ मार्च रोजी मडगाव येथून दुपारी १.४० वाजता सुटेल. ही रेल्वेगाडी २२ मार्च रोजी पहाटे ४.०५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.
तिकीट आरक्षण २४ फेब्रुवारीपासून
या रेल्वेगाड्यांचे तिकीट आरक्षण २४ फेब्रुवारी रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसी या संकेतस्थळावर सुरू होईल, अशी माहिती कोकण रेल्वेने दिली.