लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : महाकुंभमेळ्याला जाणाऱ्या यात्रेकरूंचा प्रवास सुकर होण्यात भारतीय रेल्वे महत्त्वाची भूमिका बजावत आहे. कुंभमेळ्याला जाणाऱ्या भाविकांची प्रचंड गर्दी लक्षात घेऊन, पश्चिम रेल्वे मुंबई सेंट्रल, वापी, वलसाड, उधना, वडोदरा, विश्वामित्री, अहमदाबाद, साबरमती, भावनगर, राजकोट, इंदूर या पश्चिम रेल्वेच्या विविध स्थानकांवरून १२५ विशेष गाड्या चालवत आहे. तर, मध्य रेल्वेवरील मुंबई विभागातून ८२३ रेल्वेगाड्या चालवण्यात आल्या. यामध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ७०८ आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ११५ रेल्वेगाड्या चालवण्यात आल्या.

कुंभमेळ्याला देशभरातून लाखो नागरिक जात आहेत कुंभमेळ्यासाठीच्या विशेष गाड्या प्रयागराज तसेच जवळच्या इतर रेल्वे स्थानकांसाठी चालवल्या जात आहेत. त्याचा फायदा घेऊन हजारो भाविक कुंभमेळ्यात पोहोचत आहेत. पश्चिम रेल्वेने या कुंभ विशेष रेल्वेगाड्यांद्वारे १.६५ लाखांहून अधिक यात्रेकरूंना त्यांच्या गंतव्यस्थानावर पोहोचवले आहे.

कुंभ विशेष गाड्यांच्या २६ फेऱ्या मुंबई मध्यवर्ती विभागातून, २४ फेऱ्या अहमदाबाद विभागातून, ८ फेऱ्या भावनगर विभागातून, ४ फेऱ्या राजकोट विभागातून, २ फेऱ्या वडोदरा विभागातून आणि ६ फेऱ्या रतलाम विभागातून चालवल्या जात आहेत. कुंभमेळ्याला ये-जा करणाऱ्या भाविकांचा प्रवास सुरक्षित आणि आरामदायी व्हावा यासाठी रेल्वे प्रशासन अथक प्रयत्न करत आहे, असे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी सांगितले.

मध्य रेल्वेने महाकुंभ २०२५ साठी विविध स्थानकांवर ६,५०० हून अधिक रेल्वेगाड्यांच्या थांब्यांसह भाविकांना सुविधा दिली. ८ जानेवारीपासून लोकमान्य टिळक टर्मिनस येथून नियमित आणि विशेष रेल्वेसह ७०८ रेल्वेगाड्या आणि सीएसएमटीवरून ११५ रेल्वेगाड्या चालवण्यात आल्या. मुंबई व्यतिरिक्त पुणे विभागातून ६ विशेष गाड्यांसह १०२ रेल्वेगाड्या फेऱ्या, नागपूर स्थानकावर ६ विशेष रेल्वेगाड्यांसह २२५ रेल्वेगाड्या सेवा चालवून हजारो भाविकांची सोय करण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली.

मध्य रेल्वेच्या प्रमुख स्थानकांवरून जाणाऱ्या अनेक रेल्वेगाड्यांमध्ये भाविकांची लक्षणीय गर्दी दिसून आली. त्यामुळे प्रमुख स्थानकांवर थांबे देण्यात आले. ठाणे रेल्वे स्थानकात ३८३ रेल्वेगाड्यांना थांबे दिले. कल्याण रेल्वे स्थानकात ६८७ रेल्वेगाड्यांना, भुसावळ रेल्वे स्थानकात ७२३ रेल्वेगाड्यांना, नाशिक रेल्वे स्थानकात ६०१ रेल्वेगाड्यांचे, मनमाड रेल्वे स्थानकात ५३७ रेल्वेगाड्यांना, बैतूल रेल्वे स्थानकात १३८ रेल्वेगाड्यांना थांबे देण्यात आले.

Story img Loader