मुंबई : गणेशोत्सवानिमित्त मध्य आणि कोकण रेल्वेवरून २०२ गणपती विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय मध्य, कोकण रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. प्रवाशांची गर्दी विभाजित करण्यासाठी या विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहे. तर, या विशेष रेल्वेगाड्यांचे तिकीट आरक्षण २१ जुलैपासून सुरू होणार असल्याची माहिती मध्य, कोकण रेल्वे प्रशासनाने दिली.
यंदा ७ सप्टेंबर रोजी गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. मुंबईस्थित कोकणवासियांनी मुळगावी जाण्यासाठी नियमित रेल्वेगाड्यांचे तिकीट आरक्षण केले आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात नियमित रेल्वेगाड्यांचे आरक्षण क्षमतेपेक्षा अधिक झाले आहे. तर, ज्या प्रवाशांना नियमित रेल्वेगाड्यांचे तिकीट आरक्षण मिळाले नाही, त्याच्यासाठी विशेष रेल्वेगाड्या दिलासा ठरणार आहेत.
हेही वाचा – मुंबई : एमएमआरडीएला ३००० पैकी केवळ २५०० कोटीच देणार, महापालिका प्रशासनाचा निर्णय
१ ते १८ सप्टेंबर या कालावधीत विशेष रेल्वेगाड्या धावणार आहेत. सीएसएमटी – सावंतवाडी – सीएसएमटी (३६ फेऱ्या), सीएसएमटी – रत्नागिरी – सीएसएमटी (३६ फेऱ्या), एलटीटी – कुडाळ – एलटीटी (३६ फेऱ्या), एलटीटी – सावंतवाडी रोड – एलटीटी (३६ फेऱ्या), एलटीटी – कुडाळ – एलटीटी त्रि – साप्ताहिक विशेष (१६ फेऱ्या), एलटीटी – कुडाळ – एलटीटी वातानुकूलित साप्ताहिक विशेष (६ फेऱ्या), दिवा – चिपळूण – दिवा मेमू अनारक्षित विशेष (३६ फेऱ्या) धावणार आहेत.