मुंबई : उन्हाळ्याच्या सुट्टीत होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने नियमित गाड्यांव्यतिरिक्त १,२०४ उन्हाळी विशेष रेल्वेगाड्या घोषणा केली आहे. यामध्ये २९० अनारक्षित रेल्वेगाड्या आणि ४२ वातानुकूलित उन्हाळी विशेष रेल्वेगाड्यांचा समावेश आहे. आता प्रवाशांसाठी सहा अतिरिक्त अनारक्षित विशेष रेल्वेगाड्या चालविण्यात येणार आहेत. या रेल्वेगाड्या भिवंडी, ठाण्यावरून सोडण्यात येणार असून, या परिसरातील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, भिवंडी – सांकराईल अनारक्षित साप्ताहिक विशेष रेल्वेगाडीच्या तीन फेऱ्या धावणार आहेत. गाडी क्रमांक ०११४९ अनारक्षित विशेष रेल्वेगाड्या ९ एप्रिल ते २३ एप्रिलदरम्यान दर बुधवारी भिवंडी येथून रात्री १०.३० वाजता सुटेल आणि सांकराईल माल टर्मिनल यार्ड येथे तिसऱ्या दिवशी दुपारी १ वाजता पोहोचेल. या रेल्वेगाडीला कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, रायपुर, बिलासपुर, झारसुगुडा, राउरकेला, चक्रधरपुर, टाटानगर आणि खडगपुर येथे थांबा असेल. या रेल्वेगाडीला १० सामान्य द्वितीय श्रेणी, २ द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन आणि १० पार्सल व्हॅन असतील.
ठाणे खडगपूर अनारक्षित साप्ताहिक विशेष रेल्वेगाडीच्या तीन फेऱ्या धावणार आहेत. गाडी क्रमांक ०११५० अनारक्षित विशेष रेल्वेगाडी १२ एप्रिल ते २६ एप्रिल दरम्यान दर शनिवारी खडगपूर येथून रात्री ११.४५ वाजता सुटेल आणि ठाणे येथे तिसऱ्या दिवशी सकाळी १०.३० वाजता पोहचेल. या रेल्वेगाडीला टाटानगर, चक्रधरपुर, राउरकेला, झारसुगुडा, बिलासपुर, रायपुर, गोंदिया, नागपूर, वर्धा, बडनेरा, अकोला, भुसावळ, जळगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी आणि कल्याण येथे थांबा असेल. या रेल्वेगाडीला १० सामान्य द्वितीय श्रेणी, २ द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन आणि १० पार्सल व्हॅन असतील. अनारक्षित विशेष रेल्वेगाड्या आणि डब्यासाठी तिकिटे सामान्य शुल्कात यूटीएसद्वारे आरक्षित करता येतील, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली.
मुंबई – करमळी विशेष रेल्वेगाडी
गाडी क्रमांक ०१०५१ लोकमान्य टिळक टर्मिनस – करमळी वातानुकूलित विशेष साप्ताहिक रेल्वेगाडी ११ एप्रिल ते २३ मेदरम्यान दर शुक्रवारी रात्री १०.१५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटेल. ही रेल्वेगाडी दुसऱ्या दिवशी दुपारी १२ वाजता करमळी येथे पोहोचेल.
गाडी क्रमांक ०१०५२ करमळी – लोकमान्य टिळक टर्मिनस वातानुकूलित विशेष साप्ताहिक रेल्वेगाडी १२ एप्रिल ते २४ मेदरम्यान दर शनिवारी करमळीहून दुपारी २.३० वाजता सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी पहाटे ४.०५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.
या रेल्वेगाडीला ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिवि या स्थानकावर थांबा असेल. या रेल्वेगाडीला एकूण २० एलएचबी डबे असतील. यामधील द्वितीय श्रेणी वातानुकूलित ८ डबे, तृतीय श्रेणी वातानुकूलित १० डबे जनरेटर कार दोन डबे असतील. या रेल्वेगाडीचे आरक्षण ८ एप्रिल रोजीपासून प्रवासी आरक्षण यंत्रणा (पीआरएस) आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर सुरू झाले आहे.