राज्याच्या विधिमंडळात सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार टोलेबाजी होताना दिसत आहे. विरोधकांकडून अधिवेशनात अनेक प्रकरणांचा उल्लेख करत त्याच्या तपासाची आणि गुन्हेगारांवर कारवाईची मागणी होत आहे. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देत असताना राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलेलं वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. यामुळे अजित पवार नाराज आहेत का? असे तर्कवितर्क लावले जात आहेत.
अधिवेशनात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत असताना अजित पवारांनी छगन भुजबळ, जयंत पाटील आणि दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे बोट करत हे तिघेही गृहमंत्री झाले, मात्र मलाच गृहमंत्रीपद मिळालं नाही, असं मिश्किलपणे म्हटलं. त्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला. मात्र, सभागृहाबाहेर या वक्तव्याचे वेगवेगळे अर्थ काढून चर्चांना उधाण आलेलं पाहायला मिळालं.
नेमकं काय घडलं?
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “दिलीप वळसे पाटील गृहमंत्री होते. त्यामुळे त्यांना माहिती आहे की, तपासात मंत्री किंवा सरकार यांना हस्तक्षेप करता येत नाही. याबाबत उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाचे अनेक निर्णय आहेत. त्यात त्यांनी शासनाला फटकारलं आहे. तसेच सरकारला तपासात हस्तक्षेप करता येणार नाही, असं म्हटलंय. तथापि हा तपास लवकरात लवकर झाला पाहिजे याच्याशी सरकार सहमत आहे.”
हेही वाचा : “अजूनपर्यंत माझ्या पोरांच्या हक्काची संपत्ती त्यांच्या नावावर झाली नाही”, भर अधिवेशनात यशोमती ठाकूर भावुक
यावर अजित पवार यांनी छगन भुजबळ, जयंत पाटील आणि दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे बोट करत प्रतिक्रिया दिली. “एक, दोन, तीन या तिघांनाही गृहमंत्रीपद मिळालं, मलाच गृहमंत्रीपद मिळालं नाही,” अशी मिश्किल टिपण्णी अजित पवारांनी अधिवेशनात केली. यावर जयंत पाटील अजित पवारांना पुढच्यावेळी तुम्हाला गृहमंत्रीपद मिळेल, असं म्हटले. या चर्चेत बोलण्यासाठी उभ्या असलेल्या देवेंद्र फडणवीसांनाही हसू अनावर झालं.