मुंबई : भरधाव वेगात धावणारा मुंबई महापालिकेचा कचरावाहू ट्रक शुक्रवारी सकाळी पूर्व द्रुतगती मार्गावरील चेंबूर परिसरात अचानक उलटला. या अपघातात ट्रकमधील कामगाराचा मृत्यू झाला असून अन्य दोघे जखमी झाले. आपघातामुळे या मार्गावर बराच वेळ वाहतूक कोंडी झाली होती.

पूर्व द्रुतगती मार्गावरील चेंबूरमधील सिद्धार्थ कॉलनी परिसरात सकाळी ७ च्या सुमारास हा अपघात झाला. घाटकोपर येथून कचरा घेऊन ट्रक शीवच्या दिशेने जात होता. अचानक तो सिद्धार्थ कॉलनी परिसरातील दुभाजकावर धडकला आणि तो उलटला. चालक अल्लाउद्दीन शहा (२७) याने प्रसंगावधान राखून गाडीतून उडी मारली. मात्र त्याच्यासोबत असलेला कामगार अब्दुल नाय (२६) हा ट्रक खालीच अडकला. स्थानिक रहिवाशांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर तत्काळ पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि क्रेनच्या साह्याने ट्रक बाजूला केला. त्यानंतर जखमी कामगाराला राजावाडी रुग्णालायत दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

या अपघातात अल्लाउद्दीन शहा (२७) आणि त्याचा एक सहकारी आरिफ खान (२२) जखमी झाले असून त्यांच्यावर राजावाडी रुग्णालायत उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर पूर्व द्रुतगती मार्गावर बराच वेळ वाहतूक कोंडी झाली होती. मात्र पोलिसांनी रस्त्यावरून ट्रक हटवून येथील वाहतूक पूर्ववत केली. चेंबूर पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून पोलीस यामध्ये अधिक तपास करीत आहेत.