मुंबईतील वरळी सी लिंकवरील टोल नाक्यावर मोठा अपघात झाला. एका इनोव्हा गाडी चालकाने आधी मर्सिडीजला धक्का दिला आणि त्यानंतर टोल नाक्यावरून घाईत जाण्यासाठी टोल नाक्यावर उभ्या असलेल्या दोन ते तीन गाड्यांना मागून वेगाने जोरदार धडक दिली. यात ९ नागरिक जखमी झाले. यातील तिघांचा मृत्यू झाला आहे, तर सहा लोक जखमी असून आहेत. जखमींवर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर वांद्रे पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
डीसीपी कृष्णकांत उपाध्ये या अपघाताची माहिती देताना म्हणाले, “आज रात्री सव्वादहा वाजण्याच्या सुमारास एक इनोव्हा गाडी वरळीहून वांद्र्याकडे जात होती. सी लिंकवर टोल प्लाझापासून १०० मीटर अंतरावर ही इनोव्हा गाडी मर्सिडीज गाडीला घासून गेली. त्यानंतर इनोव्हा चालकाने गाडीचा वेग वाढवला आणि टोल प्लाझावरून लवकर जाण्यासाठी पुढे येऊन दोन तीन गाड्यांना धडक दिली.”
“या अपघातात ९ लोक जखमी झाले होते. त्यातील तिघांची प्रकृती गंभीर होती. त्या तिघांचा उपचारादरम्यान मृत्य झाला आहे. मृतांमध्ये दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. उर्वरित सहा जणांवर उपचार सुरू आहेत. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे, तर चार जणांची प्रकृती स्थिर आहे. जखमींवर भाभा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींपैकी एका रुग्णाला लिलावती रुग्णालयात हलवण्यात आलं आहे,” अशी माहिती डीसीपी उपाध्ये यांनी दिली.
हेही वाचा : ‘समृद्धी’वर भरधाव कारचा टायर फुटला, अपघातात पाच प्रवासी जखमी
या अपघातात मर्सिडीज गाडीसह सहा गाड्यांचं नुकसान झाल्याचंही पोलिसांनी नमूद केलं.