मुंबई : पूर्व मुक्त मार्गांवर ऑरेंज गेट जवळ सोमवारी पहाटे ५ वाजता झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून, चार जण गंभीर जखमी झाले. भरधाव वेगात असलेल्या पांढऱ्या रंगाच्या मोटरगाडीने दुभाजकाला धडक दिल्याने हा अपघात घडला. याप्रकरणी शिवडी पोलिसांनी चालकाविरोधात गुन्हा दाखल केला. दक्षिण नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पांढऱ्या रंगाची इको मोटरगाडी पूर्व मुक्तमार्गांवरील ऑरेंज गेटजवळ दुभाजकावर धडकली. या अपघातात मोटरगाडीमधील सहा जण गंभीर जखमी झाले. जखमींना तत्काळ जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी विनोद रामा वायडे (५२) आणि अनिता रामजी जैस्वार (६०) यांना मृत घोषित केले. उर्वरित चार जणांवर जे.जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींपैकी खुशबू रामनयन राजभर (२१) या कळवा येथील हिंदी हायस्कूलमध्ये शिक्षिका आहेत.

आपण आणि आई गीता राजभर, विनोद वायडे, अनिता जैस्वार, सुलोचना वायडे आणि चालक चेतन नंदू पाटील सोमवारी पहाटे ४ वाजता वाघोबा नगर, कल्याणहून भाऊचा धक्का येथे मासे खरेदीसाठी निघाले होतो, असे अनिता रामजी जैस्वारने पोलिसांना जबाबात सांगितले.

चालक चेतन पाटील हा अतिशय भरधाव वेगात वाहन चालवत होता. तिने वारंवार सावधगिरी बाळगण्यास सांगितले, तरी त्याने ऐकले नाही. परिणामी, ऑरेंज गेट रॅम्पजवळ त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि मोटरगाडी थेट दुभाजकावर धडकली. यात विनोद वायडे आणि अनिता जैस्वार यांचा जागीच मृत्यू झाला, तर आपल्यासह आई गीता राजभर, सुलोचना वायडे आणि चालक चेतन पाटील हे गंभीर जखमी झाले, असे खुशबूने सांगितले. खुशबूच्या तक्रारीवरून शिवडी पोलिसांनी चालक चेतन पाटील याच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम २८१ व १०५, तसेच मोटार वाहन कायद्यातील कलम १८४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. विनोद आणि अनिता यांचा मृतदेह शवविच्छेदनानंतर त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. घटनास्थळी न्यायवैधक पथकाने तपास करून आवश्यक पुरावे गोळा केले आहेत. चालक व अन्य जखमींच्यावर सध्या जे.जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चालकावरील उपचार झाल्यानंतर त्याच्याविरोधात पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.