मुंबई : भरधाव वेगात असलेल्या एका पाण्याच्या टँकरने रस्त्यावरून जाणाऱ्या पादचाऱ्याला जबर धडक दिल्याची घटना शनिवारी रात्री कुर्ला परिसरात घडली आहे. या अपघातात या पादचाऱ्याचा मृत्यू झाला असून कुर्ला पोलिसांनी टँकर चालकावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
कुर्ल्याच्या एलबीएस मार्गावरील सुर्वे जंक्शन परिसरात शनिवार रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली आहे. या परिसरातून साठ वर्षीय व्यक्ती रस्त्याच्या कडेने चालत जात होती. त्या वेळी त्या मार्गावरून भरधाव वेगात आलेल्या टँकरने त्या व्यक्तीला जबर धडक दिली. त्या अपघातात अनोळखी इसमाच्या पायाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. कुर्ला पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
त्यानंतर त्यांनी या इसमाला कुर्ला पश्चिम येथे असलेल्या भाभा रुग्णाला दाखल केले. मात्र तेथे उपचार सुरू असताना रात्री दहाच्या सुमारास त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. याबाबत कुर्ला पोलिसांनी टँकर चालक संतराम वर्मा (४९) याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.