SpiceJet flight from Mumbai to Dubai delayed : मुंबईहून दुबईला जाणाऱ्या स्पाईसजेटच्या विमानाला तब्बल १२ तास उशीर झाला होता. त्यामुळे जवळपास १५० हून अधिक प्रवासी मुंबई विमानतळावर ताटकळत होते. ३१ ऑगस्ट रोजी रात्री ११.३० वाजता या विमानाचं उड्डाण होणार होतं, परंतु, १ सप्टेंबर रोजी दुपारी या विमानाने टेक ऑफ घेतले. यामुळे प्रवाशांना प्रचंड मानसिक त्रास झाला असून त्यांची गैरसोय झाली आहे. इंडियन एक्स्प्रेसने या संदर्भातील वृत्त दिलं आहे.
लंडनमध्ये शिकत असलेला मुंबईचा १९ वर्षीय रुहान चावला म्हणाला की, “विमानतळावरील ग्राउंड स्टाफचे व्यवस्थापन खराब होते. आम्हाला कोणत्याही गोष्टींची माहिती दिली जात नव्हती. त्या कालावधीत त्यांनी आम्हाला एकच बर्गर दिला.”विमानाला उशीर होण्यामागचं कारण ग्राऊंड स्टाफलाही माहित नव्हतं. ज्यांना वेळेत दुबईला पोहोचायचे होते, त्यांनी पर्याय शोधला असल्याचंही म्हटलं जातंय.
मी रात्रभर थरथर कापत होते
छाया औरंगाबादवाला या बोरिवलीतील ज्येष्ठ नागरिक आपल्या मुलाला भेटण्यासाठी दुबईला जात होत्या. त्यांचा हा पहिलाच विमान प्रवास होता. पण तरीही त्यांनी हा विलंब सहन केला. त्या म्हणाल्या, “मी ज्येष्ठ नागरिक असूनही विमानतळ कर्मचारी सहकार्य करत नव्हते. मी रात्रभर थरथरत होते, पण ग्राउंड स्टाफने ब्लँकेटही दिले नाही”, ती म्हणाली.
हेही वाचा >> स्पाइसजेटच्या विमानात धक्कादायक प्रकार, टेक ऑफ होताच टॉयलेटमध्ये अडकला प्रवासी; तासभरच्या प्रवासात काय घडलं?
३० ऑगस्ट रोजीही दुबईला जाणाऱ्या स्पाईसजेटच्या एका फ्लाईटला असाच उशीर झाला होता. अखेरीस ते फ्लाईट रद्द करावं लागलं. यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली होती. अचनाक फ्लाईट रद्द करूनही प्रवाशांना कोणतीही नुकसान भरपाई देण्यात आली नाही. त्यांना ३१ ऑगस्टच्या फ्लाईटमधून प्रवास करण्याची सूचना करण्यात आली. त्यामुळे अनेकांना त्यांचे नियोजित कार्यक्रम रद्द करावे लागले, तर काहींना पुढे ढकलावे लागले. परंतु, ३१ ऑगस्ट रोजीच्या फ्लाईटने १२ तास उशिराने उड्डाण केले.
कर्मचाऱ्यांकडून सहकार्य मिळालं नाही
याबाबत कामाच्या निमित्ताने मुंबई आलेल्या प्रियांका पंडुरे म्हणाल्या, मी ३० ऑगस्टच्या सायंकाळी मुंबई विमानतळावर आले. माझं ३१ ऑगस्ट रोजी पहाटे २ वाजता फ्लाईट होतं. परंतु विलंबानंतर हे फ्लाईटच रद्द करण्यात आलं. विमानतळ कर्मचाऱ्यांकडून मला वारंवार अपडेट्स घ्यावे लागत होते. परंतु, त्यांच्याकडून योग्य सहकार्य मिळालं नाही. मुंबईत राहण्याकरता माझे कोणीही नातेवाईक नाही. त्यामुळे विमानतळ कर्मचाऱ्यांना विनंती केल्यानंतर त्यांनी राहण्याची सोय केली. अशा मदतीशिवाय मी आणि माझ्या सहप्रवाशांनी दोन रात्री विमानतळावर घालवल्या. आम्हाला फक्त एक बर्गर दिला गेला. ग्राऊंड स्टाफने आम्हाला वाईट वागणूक दिली. हा माझ्या आयुष्यातील सर्वांत वाईट अनुभव होता.
क्रू बदलल्यामुळे विलंब
केबिन क्रूमधील काही कर्मचाऱ्यांचा पगार न मिळाल्याने ते संपावर असल्याने कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. यामुळे कामकाजात उशीर झाल्याची शक्यता आहे. तर, स्पाईसजेटच्या प्रवक्त्याने इंडियन एक्सप्रेसला सांगितले, “३१ ऑगस्ट रोजी, स्पाईसजेट फ्लाइट SG १३ मुंबई ते दुबईला तांत्रिक समस्येमुळे उशीर झाला. समस्येचे त्वरित निराकरण केले जात असताना, ऑपरेटिंग क्रूने त्यांच्या फ्लाइट ड्युटी टाइम मर्यादा (FDTL) ओलांडल्या होत्या. ज्यामुळे क्रू बदलणे आवश्यक होते, ज्यामुळे आणखी विलंब झाला. आमच्या प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही मनापासून दिलगीर आहोत.”