मुंबई : ‘स्पायडर-मॅन’ या चित्रपटाच्या श्रृंखलेने आजवर सर्व वयोगटातील प्रेक्षकांचे मनोरंजन करीत अभूतपूर्व यश कमावले. आतापर्यंत जगभरातील सर्वाधिक पसंतीचा सुपरहिरो ठरलेला ‘स्पायडर-मॅन’ त्याच्या नव्या चित्रपटासाठी विविध भाषांमधून प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाला आहे.
लहान-थोरांना हा सुपरहिरो आपलासा वाटतो. देशभरात ‘स्पायडर-मॅन’चा मोठा चाहता वर्ग आहे. हाच धागा पकडून निर्मात्यांनी ‘स्पायडर-मॅन’चा नवीन चित्रपट भारतात सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी वेगवेगळ्या भाषेत डब करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘स्पायडर-मॅन: अक्रॉस द स्पायडर-व्हर्स’ हा चित्रपट इंग्रजीबरोबरच हिंदी, तमीळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम्, गुजराती, मराठी, पंजाबी आणि बंगाली अशा १० भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. मराठी भाषेतील या चित्रपटाचा ट्रेलरही नुकताच प्रदर्शित झाला आहे. ‘सोनी पिक्चर्स एन्टरटेन्मेट इंडिया’ निर्मित ‘स्पायडर-मॅन: अक्रॉस द स्पायडर-व्हर्स’ हा चित्रपट २ जूनपासून प्रेक्षकांना चित्रपटगृहात पाहता येणार आहे.
हेही वाचा – ‘Hello Mumbai’ टॅगलाइनअंतर्गत देशात उभे राहणार Appleचे पहिले स्टोअर, फोटो आले समोर
‘स्पायडरमॅन नो वे होम’ या चित्रपटाला भारतातील प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे नवा चित्रपटही भारतातील प्रत्येकाला त्याच्या स्वतःच्या भाषेत अनुभवता यावा अशी आमची इच्छा होती. दहा भाषांमध्ये ‘स्पायडर-मॅन: अक्रॉस द स्पायडर-व्हर्स’ प्रदर्शित करण्याच्या आमच्या निर्णयाचा आम्हाला अभिमान वाटतो. देशभरातील प्रेक्षक या चित्रपटावर प्रेम करतील याची खात्री मला वाटते’, असे मत ‘सोनी पिक्चर्स रिलीझिंग इंटरनॅशनल, इंडिया’चे महाव्यवस्थापक आणि प्रमुख शोनी पंजीकरण यांनी व्यक्त केले.
‘स्पायडर-मॅन: अक्रॉस द स्पायडर-व्हर्स’ या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे यात विविध देशांतील ‘स्पायडर मॅन’चे अवतार पाहायला मिळणार असून त्याच्या भारतीय अवताराची झलकही या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.