रिपब्लिकन पक्षाच्या फाटाफुटीवर आणि सत्तासौदेबाजीच्या राजकारणावर टीका करीत स्थापन झालेल्या बहुजन समाज पक्षालाही रिपब्लिकन गटबाजीची लागण झाली आहे. पक्षाचे राष्ट्रीय महासचिव डॉ. सुरेश माने यांची हकालपट्टी केल्यानंतर बसपत उभे दोन गट पडले आहेत. माने यांनी आता बसप व बामसेफमधील समर्थकांना सोबत घेऊन नव्या पक्षस्थापनेच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
महाराष्ट्रात निवडणुकांच्या हंगामात बसपचा बोलबाला खूप व्हायचा, परंतु गेल्या तीस वर्षांत स्थानिक स्वराज्य संस्थांमधील चार-दोन जागांचा अपवाद वगळला, तर लोकसभा व विधानसभा निवडणुकीत यश मिळाले नाही. त्यातच अलीकडे लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या वेळी पक्षात नेतृत्व स्पर्धेतून गटबाजीला उधाण आले. सुरेश माने यांच्याकडे महाराष्ट्राची जबाबदारी दिल्याने प्रदेशाध्यक्ष विलास गरुड यांचा गट नाराज होता. दोन्ही निवडणुकांमध्ये पक्षाने पराभवाचा तडाखा खाल्ल्यानंतर कार्यकर्त्यांमध्येही मरगळ आली होती.
दरम्यान, सुरेश माने यांच्याकडील राज्याची जबाबदारी काढून घेण्यात आली. त्यामुळे अवमानीत झालेल्या माने यांनी पक्षनेतृत्वाविरोधात बंडाचा पवित्रा घेतला. भंडारा व गोंदिया जिल्हा परिषदांच्या निवडणुका लढवायच्या नाहीत असा पक्षादेश असतानाही माने यांच्या पुढाकाराने बहुजन समाज परिषद नावाने बसपचेच कार्यकर्ते निवडणुकीत उतरवले. त्याची दखल घेऊन मायावती यांनी २६ जूनला लखनौमध्ये घेतलेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत सुरेश माने, तसेच किशोर गजभिये व अन्य काही बंडखोर पदाधिकाऱ्यांना पक्षातून बडतर्फ करण्याचा निर्णय घेतला. प्रदेशाध्यक्ष विलास गरुड यांनी ही माहिती दिली. सुरेश माने यांनीही त्यावर पत्रक काढून, बसपला सोडचिठ्ठी देत असल्याचे जाहीर केले. त्याचबरोबर बसप व बामसेफमधील आपल्या समर्थकांशी चर्चा करून जुलै महिन्यातच नवा राजकीय पर्याय देण्याचा निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा