मुंबई : मुंबईकरांचा प्रवास जलद व वेगवान होण्याच्या उद्देशाने उभारण्यात आलेल्या सागरी किनारा मार्गावर दररोज रात्री स्पोर्ट्स गाड्यांचा धुमाकूळ सुरू आहेत. गाड्यांच्या भरधाव वेग आणि कर्णकर्कश आवाजाने वरळी सी फेस आणि आसपासच्या परिसरात वास्तव्यास असलेल्या रहिवाशांची झोपमोड होता आहे. वाहतूक पोलिसांकडे वारंवार तक्रार करूनही पोलीस दखल घेत नसल्याचा आरोप रहिवाशांकडून करण्यात येत आहे.

मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी आणि प्रवास वेगवान व्हावा या हेतूने महानगरपालिका प्रशासनातर्फे सागरी किनारा रस्ता प्रकल्प उभारण्यात येत आहे. या प्रकल्पातील दक्षिण वाहिनी पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आली असून उत्तर वाहिनीचे टप्प्याटप्प्याने काम सुरू आहे. सागरी किनारा मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या आता लाखांच्या घरात पोहोचली आहे. त्यामुळे मार्गावर अनेकदा वाहतूक कोंडीचीही समस्या निर्माण होते. गेल्या काही महिन्यांपासून रात्री या मार्गावर स्पोर्ट्स गाड्यांची शर्यत लागत आहे. भरधाव वेगात धावणाऱ्या गाड्या, कर्णकर्कश आवाज आदींमुळे वरळी सी फेस, नेपिसियन रोड, ब्रीच कँडी आणि आसपासच्या परिसरात वास्तव्यास असलेले रहिवासी हैराण झाले आहेत. दररोज रात्री किनारा मार्गावर गाड्यांचा धुमाकूळ असून या प्रकाराकडून वाहतूक पोलीस दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप रहिवाशांकडून करण्यात येत आहे. या मार्गावर आवाजरोधक बसविण्यात यावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे. सागरी किनारा मार्गापासून काहीच अंतरावर ब्रीच कँडी रुग्णालय असून तेथील रुग्णांनाही आवाजामुळे त्रास होऊ लागला आहे.

सागरी किनारा मार्गावर रात्री १० ते १२ या वेळेत ध्वनी प्रदुषण करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करावी. यापूर्वी या समस्येसंदर्भात पोलिसांकडे चार वेळा तक्रार केली. मात्र, अद्यापही त्यांच्याकडून प्रतिसाद मिळालेला नाही, अशी खंत स्थानिक रहिवासी वीरेन शाह यांनी व्यक्त केली.

Story img Loader