झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने (एसआरए) मुंबईतील आरे दूध कॉलनी येथील पुनर्वसन प्रकल्प रद्द करण्यात आला असल्याची माहिती दिली आहे. आरे आणि दिंडोशी येथील परिसरात एसआरएचा हा पुनर्वसन प्रकल्प होणार होता. याआधी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने (एसआरए) आरे कॉलनीतील ३२,३१० चौरस फूट क्षेत्र हे झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र म्हणून घोषित करण्याचा मानस जाहीर केला होता. मात्र मुंबई हायकोर्टाने या बांधकामावर स्थगिती आणली होती. येथील ६६ एकर सीटीएस क्र. १ जागा ही राज्य दुग्धविकास विभागाच्या मालकीची आहे.
त्यानंतर एसआरएने हरकती व सूचना देणारी नोटीस बजावली होती. कार्यकर्ते झोरू भठेना यांनी यासंदर्भात आवाज उठवला होता. नवीन विकास आराखडा २०३४ मध्ये महापालिकेने ४३ हेक्टर (१०७.५ एकर) आरे व संजय गांधी नॅशनल पार्कमधील जागा झोपडपट्टीधारक व आदिवासींच्या पुनर्वसनासाठी राखीव ठेवण्यात आली होती. मात्र आता हा प्रकल्प मागे घेण्यात आला आहे.
हे ही वाचा >> राखीव वनांत मानवी हस्तक्षेप रोखण्याचे ध्येय
एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे म्हणाले, “मी आरे येथून झोपडपट्टी पुनर्वसन योजना काढून टाकल्या आहेत.” कार्यकर्ते झोरू भठेना यांच्यासह अनेक पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी या निर्णयाचे स्वागत केले. “केवळ जंगलाच नव्हे तर मिठी आणि ओशिवरा नद्यांचा पाणलोट क्षेत्राचे संरक्षण करण्यासाठी एक हे एक चांगले पाऊल आहे. या संपूर्ण भागाचे रक्षण करणे आवश्यक आहे,” असे सेव्ह आरेच्या कार्यकर्त्या अमृता भट्टाचार्य म्हणाल्या.
आरेमध्ये जंगल वसणार
नुकतेच, ‘संजय गांधी राष्ट्रीय उद्याना’जवळील आरेची जागा वनासाठी राखीव ठेवून येथे वनसंपदेचे संवर्धन करण्यासाठी अधिसूचित करण्यात आलेल्या २८६.७३२ हेक्टर जागेचा ताबा आरे दुग्ध वसाहतीकडून वन विभागास देण्यात आला होता. त्यामुळे मुंबईसारख्या महानगराच्या मध्यभागी विस्तीर्ण जंगल उभे करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बोरिवली तहसीलदार आणि मालाडचे नगर भूमापन अधिकारी यांच्या उपस्थितीत जागेचा ताबा घेण्यात आला. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात झालेल्या बैठकीत दुग्धविकासमंत्री सुनील केदार, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत यासंदर्भातील प्रस्तावावर चर्चा होऊन निर्णय घेण्यात आला होता.
आरे येथील १२५.४२२ हेक्टर, गोरेगाव येथील ७१.६३१ हेक्टर आणि मरोळ मरोशी येथील ८९.६७९ हेक्टर इतकी जागा वन विभागाच्या ताब्यात देण्यात आली. याव्यतिरिक्त मरोळ मरोशी गावातील ४०.४६९ हेक्टर जागा यापूर्वीच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या ताब्यात देण्यात आली आहे. त्यामुळे आता ८१२ एकर जागेवर जंगल वसवता येणार आहे.