प्रस्तावित विकास आराखडय़ात आरक्षणगावठाणे आणि कोळीवाडय़ांबाबत सुस्पष्ट धोरण सादर करण्यात एकीकडे राज्य शासन अपयशी ठरलेले असतानाच कोळीवाडेही झोपु योजनांसाठी बिल्डरांना आंदण देण्याचा घाट नाही ना, असा संशय येणारे कृत्य पालिकेने केले आहे. पालिकेच्या २०१४ मध्ये येऊ घातलेल्या प्रस्तावित विकास आराखडय़ात काही कोळीवाडय़ांमध्ये थेट ‘झोपु’साठी अगोदरच आरक्षण ठेवण्यात आल्याची बाब समोर आली आहे. वरळी कोळीवाडय़ातील भंडारवाडा या चाळवजा परिसराला झोपु संबोधण्यात आले आहे. * जुने काय?पालिकेच्या मालकीच्या भूखंडांवर १९४० पूर्वीच्या चाळी असतानाही या चाळींशेजारी झोपडपट्टी असल्याचे भासवून झोपु नियमावली लागू करण्यात आल्याचे वृत्त सर्वप्रथम ‘लोकसत्ता’ने प्रकाशित केले. या वृत्तानंतर प्रचंड खळबळ माजली. महापालिकेचा भूखंड आणि त्यावर चाळी असूनही झोपडपट्टी घोषित करण्यात आल्याची अनेक प्रकरणे समोर आली. यापैकी दादर, माटुंगा, परळ, लालबाग, माहिम आदी परिसरांत ३४२ हून अधिक भूखंड झोपु योजनेसाठी बिल्डरांना आंदण देण्यात आले. आता विकासकांनी कोळीवाडय़ांकडे आपला मोर्चा वळविल्याचे दिसून येत आहे. प्रस्तावित शहर विकास आराखडय़ात झोपुचे आरक्षण या विकासकांनीच महापालिकेतील आपले वजन वापरून करून घेतले नाही ना, असा संशय व्यक्त केला जात आहे.* नवे काय? वरळी कोळीवाडय़ात इस्टेट स्कीम क्रमांक ५२ राबविली जाते. मात्र १९३३ मध्ये ३०७ भूखंडांपर्यंत ही योजना थांबली. आजपावेतो त्यात काहीही सुधारणा झालेली नाही. मात्र २०१४ च्या प्रस्तावित आराखडय़ात वारस लेन, भंडारवाडा हा परिसर झोपडपट्टी समूह विकास म्हणून दाखविण्यात आल्यामुळे रहिवाशी संतापले आहेत. या ठिकाणी एकही झोपडी नाही. मात्र १९४० पूर्वीच्या एकमजली चाळी आहेत. असे असतानाही या भूखंडावर झोपु समूह योजनेचे आरक्षण दाखविण्यात आल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अलीकडे एक विकासक स्थानिक गुंडांच्या मदतीने चाळवासीयांची संमतिपत्रे घेण्यासाठी पुढे सरसावले आहेत. वरळी कोळीवाडय़ातील भंडारवाडा ही पालिकेच्या मालमत्ता विभागाची ही मालमत्ता आहे. असे असतानाही एका विकासकाने रहिवाशांची संमती मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. प्रत्येकी पाच हजार रुपये देऊन अशी संमतिपत्रे सही करून घेतली जात आहेत. या परिसरात एक ते दोनमजली चाळी आहेत. झोपु योजनेतील तरतुदीनुसार फक्त तळमजल्याच्या बांधकामालाच मोफत घर मिळते. तेच रहिवाशी पात्र होतात. पहिल्या व दुसऱ्या मजल्यावरील रहिवाशी अपात्र ठरतात. भंडारवाडय़ात साडेसातशे रहिवाशी आहेत. तब्बल अडीचशे ते तीनशे रहिवाशांची संमती त्याला मिळाल्याचे कळते. ७० टक्के संमतिपत्रे मिळाल्यास हा विकासक रीतसर हा परिसर झोपु जाहीर करून घेऊन झोपु योजना राबवू शकतो, अशी स्थिती आहे.