मुंबई : सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहत असून प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. या धामधुमीत दादर – माहिम विधानसभेतील तिरंगी लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे, महाविकास आघाडीतर्फे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे महेश सावंत आणि महायुतीतर्फे शिंदे गटाचे विद्यमान आमदार सदा सरवणकर निवडणुकीला सामोरे जात आहेत. या पार्श्वभूमीवर सदा सरवणकर यांच्या प्रचारार्थ दादर – माहिम विधानभा मतदारसंघात गुरुवारी काढण्यात आलेल्या ‘रोड शो’मध्ये मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे हेही सहभागी झाले होते. हा रोड शो शिवसेना भवनसमोर आल्यावर श्रीकांत शिंदे आणि सदा सरवणकर यांच्यावर फुलांची उधळण करण्यात आली.
दादर – माहिम विधानसभा मतदारसंघातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात उमेदवार देऊ नये, अशी भूमिका भाजपने सुरुवातीपासूनच घेतली होती. यावरून शिंदे गट व भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये खटकेही उडाले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सदा सरवणकर हे राज ठाकरे यांच्या दादर येथील निवासस्थानी भेटण्यास गेले होते. पण राज ठाकरे यांनी भेट नाकारल्याने सरवणकर यांनी उमेदवारी कायम ठेवण्याचा निर्णय घेत जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे.
हेही वाचा >>>Shahrukh Khan: चोरलेल्या मोबाइलवरून शाहरुख खानला धमकी; मालकाला अटक होताच जुने प्रकरण आले समोर
दादर – माहिम परिसरात गुरुवारी निघालेल्या रोड शोमध्ये खासदार श्रीकांत शिंदे, माजी खासदार राहुल शेवाळे सहभागी झाले होते. या रोड शोमध्ये शिंदे गट, भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष (अजित पवार गट) आणि रिपाईच्या कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने गर्दी केली होती. आपापल्या पक्षाचे झेंडे हाती घेऊन कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला होता. भाजपचेही कार्यकर्ते हातात पक्षाचे झेंडे घेऊन सहभागी झाले होते, मात्र भाजपचे प्रमुख नेते व पदाधिकारी मात्र अनुपस्थित होते. श्रीकांत शिंदे यांचा रोड शोमधील सहभाग हा एकप्रकारे शिंदे गट सरवणकर यांच्या मागे खंबीरपणे उभा असल्याचा संदेश देणारा ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली.