नाईट रायडर्स स्पोर्टस् प्रा. लि. (केआरएसपीएल) कंपनीचे समभाग मॉरिशसमधील कंपनीला विकताना झालेल्या कथित गैरव्यवहारावरून सक्तवसुली संचालनालयाने मंगळवारी चित्रपट कलावंत शाहरुख खान याची चार तास चौकशी केली. वाढत्या असहिष्णुतेवर बोट ठेवल्यानेच शाहरुखची ही चौकशी झाली काय, असा टोला काँग्रेसने हाणला आहे.
परकीय चलन व्यवस्थापन कायद्यानुसार शाहरुखचे म्हणणे आम्ही नोंदवून घेतले, असे संचालनालयाच्या सूत्रांनी सांगितले. गरज पडल्यास शाहरुखला पुन्हा चौकशीसाठी बोलावले जाणार आहे.
खान आणि अभिनेत्री जुही चावला यांच्या ‘रेड चिलिज’कडे ‘केआरएसपीएल’ची मालकी होती. चावला यांचे पती जय मेहता यांच्या ‘सी आयलंड इन्व्हेस्टमेन्ट’ या मॉरिशसमधील कंपनीला ‘केआरएसपीएल’चे समभाग आठ ते नऊपट कमी किमतीत विकले गेल्याचा आरोप आहे. २००८-०९मध्ये हा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. परकीय चलन व्यवस्थापन कायद्यानुसार देशी समभागांची परदेशस्थ कंपनीला कमी किमतीत विक्री करता येत नाही.
याआधी १०० कोटी रुपयांच्या परकीय चलन भंगावरून २०११मध्ये सक्तवसूली संचालनालयाने शाहरुखची चौकशी केली होती.