अंबरनाथमधील एका शाळेच्या आवारात गुरुवारी परीक्षेपूर्वीच दहावीच्या बीजगणिताचा पेपर वाटणाऱ्या फिरोज अब्दुल मजीद खान या एका खासगी क्लासच्या चालकास पोलिसांनी अटक केली.  मात्र पेपर फोडण्याच्या तयारीत असताना क्लासवर छापा मारून त्याला अटक केल्याचा दावा पोलिसांनी केला. तर हा केवळ कॉपीचा प्रकार असल्याचा दावा बोर्डाच्यावतीने करण्यात आला. त्यामुळे पेपर फुटला की नाही, याबाबत संभ्रम कायम आहे.
फिरोज अंबरनाथमध्येच खासगी क्लासेस चालवितो. गुरुवारी बीजगणिताचा पेपर सुरू होण्याच्या पंधरा मिनिटे आधी फिरोज येथील फातिमा शाळेच्या आवारात प्रश्नपत्रिका वाटत असल्याचे आढळून आले. याबाबत काही विद्यार्थ्यांनी तक्रार करताच पोलिसांनी फिरोजला ताब्यात घेत त्याच्याकडील प्रश्नपत्रिका जप्त केल्या. अंबरनाथ पश्चिम भागातील शालान्त परीक्षा नियंत्रक अधिकारी आणि फातिमा शाळेचे मुख्याध्यापक हॉड्रियन डिसोजा यांनी या प्रश्नपत्रिका गुरुवारच्या बीजगणिताच्याच असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानुसार फिरोजविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

हा तर कॉपीचा प्रकार
बीजगणिताचा पेपर फुटल्याची शक्यता मुंबई विभागीय मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत पांडे यांनी फेटाळून लावली असून हा कॉपीचा प्रकार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच कॉपीचा प्रकार असल्याने पेपर पुन्हा घेण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Story img Loader