प्रवेशपत्रांच्या विघ्नातून पार पडत दहावीची परीक्षा सुरू झाली खरी, पण आता बीजगणिताचा पेपर फुटल्याने त्याला गालबोट लागले आहे. मंगळवारी बीजगणिताची परीक्षा होती. या परीक्षेत कांदिवली येथील यशवंतराव चव्हाण विद्यालयात एक मुलगा दोन प्रश्नपत्रिका घेऊन बसल्याचे निदर्शनास आले आणि पेपर फुटल्याची बातमी वाऱ्याच्या वेगाने सर्वत्र पसरली. मंडळाचे अधिकारी मात्र पेपर फुटल्याचे मान्य करीत नव्हते.
मंगळवारी परीक्षा सुरू असताना या विद्यार्थ्यांकडे प्रश्नपत्रिकेचा जाड संच आढळला. पर्यवेक्षकाने तपासणी केली असता त्याच्याकडे प्रश्नपत्रिकेचे ‘क’ आणि ‘ड’ असे दोन संच मिळाले. यातील ‘ड’ संच हा त्याला नियमानुसार सोडविण्यास देण्यात आला होता. मात्र ‘क’ संचाची उत्तरे लिहिलेली झेरॉक्स प्रत या विद्यार्थ्यांकडे होती. हा विद्यार्थी इंग्रजी माध्यमाचा असून त्याच्याकडील ‘क’ संच हा मराठी भाषेतील होता. ही बाब उघड होताच विभागीय मंडळाचे सचिव पी. आर. पवार यांनी ताबडतोब कांदिवलीतील केंद्रात धाव घेतली. यानंतर अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली. रात्री उशिरा विभागीय मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत पांडे हेही घटनास्थळी पोहोचले. विद्यार्थी, पर्यवेक्षक आणि मुख्याध्यापकांचा लेखी जबाब घेऊन कांदिवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. हा विद्यार्थी १७ नंबरचा फॉर्म भरून बाहेरून दहावीच्या परीक्षेला बसला असून तो बोरिवली येथे राहणारा आहे.
प्राथमिक चौकशीत त्याने बोरिवली रेल्वे स्थानकातून ही प्रश्नपत्रिका ५०० रुपयांना विकत घेतल्याचे समजले. आता या विद्यार्थ्यांला ‘क’ संच कसा मिळाला हा प्रश्न अनुत्तरितच असून याची चौकशी पोलीस करीत आहेत. पोलिसांची चौकशी पूर्ण झाल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल, असे मंडळाचे विभागीय अध्यक्ष लक्ष्मीकांत पांडे यांनी स्पष्ट केले. या पेपरफुटीची व्याप्ती ही त्या विद्यार्थ्यांपुरतीच मर्यादित असल्याचा पांडे यांचा दावा असला तरी स्थानकावर एकाच विद्यार्थ्यांला पेपर विकला गेला काय, हा प्रश्नही अनुत्तरित आहे.

Story img Loader