दहावीच्या परीक्षेत प्रत्येक पेपरला एक दिवस सुटी देण्यात येईल, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने गतवर्षीच्या वेळापत्रकातील गोंधळानंतर स्पष्ट केले होते. मात्र यंदा पुन्हा इंग्रजी माध्यमात मराठी विषयासाठी एकही दिवस सुटी देण्यात आलेली नाही. यामुळे या विषयाची परीक्षा देणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांचे यामुळे नुकसान होणार आहे. विशेष म्हणजे, बोर्डानेच केलेल्या आवाहनानंतर या पेपरचे वेळापत्रक बदलण्याची मागणी करणाऱ्या पालकांना आता ‘हुसकावून’ लावण्यात येत आहे.
इंग्रजी माध्यमाच्या भूगोल-अर्थशास्त्र या विषयाची परीक्षा २२ मार्च रोजी होणार आहे. त्यानंतर २३ मार्च रोजी रविवारची सुट्टी आहे. सोमवारी मंडळाने माहिती तंत्रज्ञान व संप्रेशण या विषयाची ४० गुणांची परीक्षा सकाळी ११ ते १ या वेळात ठेवली आहे. यानंतर दुसऱ्याच दिवशी, मंगळवारी द्वितीय व तृतीय भाषांची परीक्षा आहे. यामध्ये इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांचा मराठी हा विषय व इतर सात भाषांच्या परीक्षांचाही समावेश आहे. वेळापत्रक जाहीर केल्यानंतर मंडळाने वेळापत्रकात काही सुधारणा करावयाच्या असतील तर त्या कळविण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार काही पालकांनी मंडळाला ही बाब निदर्शनास आणून दिली. मात्र यात कोणताही बदल होणार नसल्याचे मंडळाने पालकांना कळविल्यामुळे पालकांमध्ये नाराजी पसरली आहे.
शिक्षणमंत्र्यांना गळ
‘द्वितीय भाषा मराठी’ या विषयासाठी विद्यार्थ्यांना गद्याचे १२ पाठ, पद्याचे सात, स्थूलवाचनाचे चार पाठ आहेत. याशिवाय कथालेखन, निबंध, पत्र, गद्य आकलन, जाहिरात वृन्तात आदीचा अभ्यास करावा लागतो. यासर्वाचे पुनर्वाचन करण्यासाठी एक दिवस पुरेसा नसल्याचे पालकांचे व शिक्षकांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता याबाबत शिक्षणमंत्र्यांनी दखल घ्यावी अशी पालकांची मागणी आहे.