लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. यंदा मुंबई विभागाच्या निकालात गतवर्षीच्या तुलनेत २ टक्क्यांनी वाढ झाली असून ९५.८३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्याचबरोबर विभागातील ८ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले आहेत तर एकूण ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही वाढली आहे. परिणामी, यंदा अकरावीसाठी नामांकित महाविद्यालयांत प्रवेश मिळवण्याची अटीतटी वाढणार हे निश्चित आहे.
यंदा दहावीच्या परीक्षेसाठी मुंबई विभागातून नियमित ३ लाख ४१ हजार १८४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ३ लाख ३९ हजार २६९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आणि ३ लाख २५ हजार १४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यंदा निकालाची एकूण टक्केवारी ही ९५.८३ टक्के इतकी आहे. विभागाच्या निकालाची एकूण टक्केवारी २०२३ साली ९३.६६ टक्के आणि २०२२ साली ९६.९४ टक्के इतकी होती.
आणखी वाचा-माथेरानमध्ये ऑगस्ट महिन्यात ‘पॉड हॉटेल’ होणार सुरू
यंदाही मुंबई विभागातून मुलींनी बाजी मारली असून मुलींच्या उत्तीर्णतेची एकूण टक्केवारी ही ९६.९५ टक्के इतकी आहे, तर मुलांच्या उत्तीर्णतेची एकूण टक्केवारी ९४.७७ टक्के आहे. मुंबई विभागातून १ लाख ७३ हजार ८४६ मुलांनी परीक्षा दिली होती, त्यापैकी १ लाख ६४ हजार ७६२ मुले उत्तीर्ण झाले. तर १ लाख ६५ हजार ४२३ मुलींनी परीक्षा दिली होती, त्यापैकी १ लाख ६० हजार ३८१ मुली उत्तीर्ण झाल्या.
विभागातील ७ हजार ७८७ विद्यार्थ्यांनी दहावीची पुनर्परीक्षा दिली होती, त्यापैकी २ हजार ८८९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. पुनर्परीक्षार्थींच्या निकालात यंदा मोठी घट झाली असून उत्तीर्णतेची एकूण टक्केवारी ३७.१० टक्के इतकी आहे. गतवर्षी ६३.१८ टक्के इतके पुनर्परीक्षार्थी उत्तीर्ण झाले होते.
आणखी वाचा-ब्लाॅकमुळे राज्यभरातून मुंबईत येणाऱ्या रेल्वेगाड्या रद्द
रायगड अव्वल, गतवर्षीच्या तुलनेत एकूण टक्केवारीत वाढ
वर्ष | ठाणे | रायगड | पालघर | मुंबई शहर | मुंबई उपनगर भाग १ | मुंबई उपनगर भाग २ |
२०२४ | ९५.५६% | ९६.७५% | ९६.०७% | ९६.१९% | ९६.१०% | ९४.८८% |
२०२३ | ९३.६३% | ९५.२८% | ९३.५५% | ९३.९५% | ९३.५५% | ९२.५६% |
२०२२ | ९७.१३% | ९७.३५% | ९७.१७% | ९६.३०% | ९६.७२% | ९६.६४% |
९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ
यंदा गुणवंतांचीही संख्या वाढली आहे. विभागातील १३ हजार ४३० विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले असून गतवर्षी ही संख्या ११ हजार ७८५ इतकी होती. तर ८५ ते ९० टक्य्यांच्या दरम्यान गुण मिळवणारे २१ हजार ५४१ विद्यार्थी आहेत. गतवर्षी ही संख्या २० हजार २७० इतकी होती. गुणफुगवटा वाढल्यामुळे यंदा नामांकित महाविद्यालयांत प्रवेश मिळवण्यासाठी अटीतटीची लढत होणार असून विद्यार्थ्यांचे लक्ष हे संबंधित महाविद्यालयांतील प्रवेश पात्रता गुणांकडे लागले आहे.
आणखी वाचा-मुंबई : ६२ वर्षे जुन्या पुलाच्या तुळ्या बदलल्या
१ हजार ५३३ शाळांचा निकाल १०० टक्के
गतवर्षीच्या तुलनेत २ टक्क्यांनी वाढ होऊन इयत्ता दहावीचा मुंबई विभागाचा निकाल ९५.८३ टक्के लागला आहे. निकालाच्या एकूण टक्केवारीत काही प्रमाणात वाढ होण्यासह १०० टक्के निकाल लागणाऱ्या शाळांच्या संख्येतही वाढ झाली आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगर भाग १, मुंबई उपनगर भाग २, ठाणे, रायगड, पालघर या भागांचा समावेश असलेल्या मुंबई विभागातील १ हजार ५३३ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. गतवर्षी मुंबई विभागातील ९७९ शाळांचा निकाल हा १०० टक्के लागला होता.