मुंबई : राज्य सरकारने मुंबईच्या प्रवेशद्वारांवरील पथकरातून एसटी महामंडळाच्या बसला वगळले आहे. त्यामुळे मुलुंड, ऐरोली, दहिसर, वाशी आणि लालबहाद्दूर शास्त्री मार्ग या पाच प्रवेशद्वारावरून जाणाऱ्या बसला पथकर भरावा लागणार नाही. दररोज राज्यभरातून एसटीच्या सुमारे २ हजार बस येतात. या एसटी बसला सुमारे १०० रुपये पथकर द्यावा लागत होता. मात्र, आता पथकार माफ झाल्याने एसटी महामंडळाची दरदिवशी सुमारे २ लाख रुपयांची बचत होणार आहे.

विधानसभा निवडणूक घोषित होण्यापूर्वी राज्य सरकारने मुंबईच्या प्रवेशद्वारांवरील पाचही टोल नाक्यांवर हलक्या वाहनांना संपूर्ण टोलमाफी देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मुंबईत दररोज ये – जा करणाऱ्या अडीच ते तीन लाख वाहनधारकांना दिलासा मिळाला. हलक्या वाहनांसह शाळेच्या बस आणि एसटी यांनाही पथकरातून सूट देण्यात आली. एसटीला यातून वगळण्यात आल्याने, एसटीच्या संबंधित विभागाने आगार व्यवस्थापकांशी संपर्क साधून, उचित कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. टोल नाक्यावर जाणाऱ्या एसटी बसला पथकर सवलतीची पावती देण्यात येणार नाही. तसेच एसटी बसला लावलेले ई-टॅग लपवण्यात येणार आहेत. यासह ई-टॅग नसलेल्या मार्गावरून एसटी चालवण्याच्या सूचना विभागीय वाहतूक अधिकाऱ्यांनी मुंबई, परळ, कुर्ला, पनवेल, उरण या आगारांतील व्यवस्थापकांना केल्या आहेत. राज्यभरातून एसटी महामंडळाच्या दररोज सुमारे १,५०० ते १,७०० बस येतात. तसेच शिवनेरीच्या सुमारे ३०० फेऱ्या होतात. याद्वारे २ हजार एसटी बससाठी दरदिवशी २ लाख रुपये पथकर द्यावा लागत होता. तर, महिन्याला सुमारे ६० लाख रुपये पथकरापोटी भरावे लागत होते. मात्र, राज्य सरकारच्या निर्णयानंतर पथकराच्या खर्चात बचत होईल, अशी माहिती एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

हेही वाचा – स्थगिती नसल्यानेच सात आमदारांच्या नियुक्त्या, राज्य सरकारची उच्च न्यायालयात भूमिका

हेही वाचा – मुंबई महापालिकेत अभियंत्यांची भरती, चार – पाच वर्ष रखडलेल्या भरतीला अखेर मुहूर्त सापडला

पथकरातून हलकी वाहने वगण्यात आल्याने टोल नाक्यांवर होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. मात्र, अवजड वाहने, ट्रक, प्रवासी बसला पथकर भरावा लागणार आहे. याबाबत मालवाहतूक संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे. कोअर कमिटीचे अध्यक्ष आणि ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे (एआयएमटीसी) माजी अध्यक्ष बल मलकित सिंग यांनी सांगितले की, हलक्या वाहनांचा पथकर रद्द केल्याच्या निर्णयाचे स्वागत. पण मुंबईकरांना अत्यावश्यक सेवा देणाऱ्या मालवाहू वाहनांना पथकर माफ करणे आवश्यक आहे.