आर्थिक डबघाईला आलेल्या एसटीचा डोलारा सांभाळण्यासाठी एसटी महामंडळाने नुकताच भाडेवाढीचा प्रस्ताव राज्य परिवहन प्राधिकरणाकडे पाठवला आहे.
२.५ टक्के भाडेवाढीच्या या प्रस्तावाबाबत उद्या, मंगळवारी एसटी महामंडळाचे अधिकारी आणि राज्य परिवहन प्राधिकरण यांची बैठक होणार आहे. या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
ही भाडेवाढ एसटीने प्रस्तावित केल्याएवढीच असेल की, त्यात काही बदल करण्यात येतील, याबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे. मात्र एसटीची प्रस्तावित वाढ मान्य झाल्यास एसटीला दरवर्षी १०० कोटी रुपयांचा जादा महसूल मिळणार आहे.
एसटी महामंडळाचा संचित तोटा एक हजार कोटींच्या वर गेला आहे. महामंडळाला राज्य सरकारकडून १६०० कोटी रुपयांचे येणे आहे. त्यातच इंधन दरवाढीमुळे एसटीचे कंबरडे मोडले आहे. या सर्व गोष्टींचा विचार करता एसटीने नुकताच २.५ टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावाबाबत राज्य परिवहन प्राधिकरण निर्णय घेणार आहे.
राज्य परिवहन प्राधिकरण आणि राज्य परिवहन महामंडळ यांच्यातील बैठक मंगळवारी पार पडणार असून या बैठकीतच या प्रस्तावाबाबत निर्णय होण्याची शक्यता राज्य परिवहन सचिव शैलेशकुमार शर्मा यांनी वर्तवली. मात्र महामंडळाचा २.५ टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव जसाच्या तसा मान्य न होता भाडेवाढीबाबतचे सूत्र लागू करूनच तो मान्य केला जाईल.
मार्च २०१४ मध्ये डिझेलच्या दरांत प्रतिलीटर ४ रुपयांची वाढ झाली होती. त्यामुळे एसटीनेही आपल्या भाडय़ात २.५४ टक्के रुपयांची वाढ करण्याचा प्रस्ताव पाठवला होता.
या प्रस्तावाला तातडीने मान्यता देण्यात आल्याने ७ मार्चपासून एसटीने दरवाढ केली होती. आता मे महिन्यातही डिझेल दरवाढ झाल्याने एसटीवर अधिक आर्थिक बोजा पडणार आहे. त्यासाठी एसटीने या भाडेवाढीची मागणी केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा