अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे प्रशासनातच नाराजी
एसटीचा तोटा अधिकाधिक वाढत असून आर्थिक चक्र बिघडत चालले असताना उच्चपदस्थ अधिकारी मात्र अमेरिकावारी करून मजेत आहेत. गेले दोन महिने व्यवस्थापकीय संचालक नसलेल्या एसटीचे गाडे रूळावर आणण्यासाठी कोणीही प्रयत्न करीत नसून अधिकाऱ्यांच्या परदेश वाऱ्या मात्र सुरू आहेत.
विकास खारगे यांची व्यवस्थापकीय संचालकपदावरून बदली झाल्यावर या पदाचा कार्यभार परिवहन आयुक्त व्ही.एन. मोरे यांच्याकडे आहे. गेल्या दोन महिन्यात ते एसटीच्या मुख्य कार्यालयात फारसे फिरकले नसून अगदी महत्वाच्या बाबी वगळता अन्य फायली ते पहातही नाहीत. परदेशांमधील सार्वजनिक उपक्रम व वाहतूक व्यवस्थेचा अभ्यास करण्यासाठी दरवर्षी उच्चस्तरीय अधिकाऱ्यांना पाठविले जाते. यावेळी २८ एप्रिल ते ६ मे पर्यंत अमेरिकेचा दौरा ठरला होता. खारगे यांची बदली झाल्याने मोरे यांच्यासह अध्यक्ष जीवन गोरे, सचिव शैलेश शर्मा, महाव्यवस्थापक अंबाडेकर हे होते. सांख्यिकी विभागातील अधिकारी संजय गांजवे आणि संगणक विभागाचे प्रमुख जयंत बामणे यांचाही या पथकात समावेश होता. एसटीची साधी वेबसाईटही अद्ययावत नसून अनेक गाडय़ा व वेळापत्रकही त्यावर नीट देण्यात आलेले नाही. संगणकीय आरक्षण करताना अनेक गाडय़ा त्यावर उपलब्धच नसतात. या अधिकाऱ्यांना परदेश वारीवर नेऊन एसटी प्रशासनाच्या सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी ते कोणते प्रयत्न करणार आहेत, असे प्रश्न प्रशासनातीलच वरिष्ठ वर्तुळात विचारला जात आहे. मोरे यांच्या मुलाचा विवाह ८ मे रोजी होता. त्यामुळे दौऱ्यावर आल्यावर ते रजेवर गेले. एसटीच्या कारभारात लक्ष घालण्यासाठी वेळ नसताना परदेश दौऱ्यासाठी मात्र त्यांनी घरातील विवाह असतानाही त्यांनी वेळ काढला. त्यांच्याकडे केवळ कार्यभार असल्याने त्यांच्या अमेरिकेला जाण्याचा एसटीला कोणता लाभ होणार आहे, अशीही चर्चा प्रशासनात आहे.
परदेशातील गाडय़ा, त्यांचे तंत्रज्ञान याचा अभ्यास करण्यासाठी अभियंते, मेकॅनिकल विभागातील काही अधिकारी नेले असते, तर एसटी बांधणीसाठी त्याचा उपयोग होऊ शकला असता. एसटीच्या गाडय़ा अधिक आरामदायी करण्यासाठी त्या तंत्रज्ञानाचा वापर आपल्याला कसा करता येईल व सेवेचा दर्जा सुधारता येईल, याचा अभ्यास करता येऊ शकला असता. पण एसटीला आर्थिक दुष्टचक्रातून बाहेर काढण्यात कोणालाही रस नसून केवळ वैयक्तिक लाभाचा विचार सुरू असल्याने एसटीच्या तोटय़ात मात्र भर पडत चालली आहे.
एसटीचे चाक गाळात, उच्चपदस्थ परदेशात!
एसटीचा तोटा अधिकाधिक वाढत असून आर्थिक चक्र बिघडत चालले असताना उच्चपदस्थ अधिकारी मात्र अमेरिकावारी करून मजेत आहेत. गेले दोन महिने व्यवस्थापकीय संचालक नसलेल्या एसटीचे गाडे रूळावर आणण्यासाठी कोणीही प्रयत्न करीत नसून अधिकाऱ्यांच्या परदेश वाऱ्या मात्र सुरू आहेत.
First published on: 11-05-2014 at 01:22 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: St bus in financial crisis and eminent officers came back from usa