रुपयाची घसरण आणि आंतरराष्ट्रीय बाजारात भडकणारे तेलाचे दर यामुळे इंधनाच्या दरांच मोठी वाढ होण्याचे संकेत अर्थतज्ज्ञ देत आहेत. या दरवाढीने राज्य परिवहन महामंडळ आणि बेस्ट या दोन संस्थांचे कंबरडे मोडणार आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार इंधनाच्या दरात एका रुपयाने वाढ झाली तर दरदिवशी एसटीला १४ लाख रुपयांचा तर ‘बेस्ट’ला ६५ हजार रुपयांचा फटका बसणार आहे. त्यामुळे डिझेल दरांत वाढ झाली की या उपक्रमांची तिकिट दरवाढही अटळ आहे.
एसटी महामंडळाच्या सर्व १८ हजार बसगाडय़ांना रोज १४ लाख लिटर एवढे डिझेल लागते. आधीच एसटी प्रशासन तोटय़ात आहे. नव्या वेतन करारामुळे एसटीवर पाच वर्षांत १६०० कोटींचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. त्यातच आता इंधनात तीन ते चार रुपये वाढ झाली तर एसटीचे कंबरडे मोडेल, अशी भीती काही अधिकाऱ्यांना वाटते.
दुसऱ्या बाजूला मुंबईकरांचे महत्त्वाचे प्रवास-साधन असलेल्या बेस्टचेही टाके या इंधनवाढीच्या आवईने ढिले झाले आहे. बेस्टच्या साडेचार हजार बसपैकी ११०० बस डिझेलवर धावतात. त्या दिवसाला ६५ हजार लिटर डिझेल पितात. बेस्ट उपक्रमाचीही आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. त्यातच दरवाढ झाली की बेस्टला तिकिटांच्या दरांत वाढ करण्याशिवाय पर्याय नाही, असे बेस्ट समितीचे अध्यक्ष नाना आंबोले यांनी स्पष्ट केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा