‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे ब्रीदवाक्य मिरवणाऱ्या एसटी महामंडळाने आपल्या ताफ्यात निमआराम गाडय़ांमध्येही नव्या दर्जाच्या गाडय़ा समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडेही पाठवण्यात आला होता. ‘शिवनेरी’प्रमाणे आरामदायक आसनव्यवस्था असणाऱ्या या गाडय़ा विकत घेण्याचा एसटी महामंडळाचा विचार होता. मात्र हा प्रस्ताव अद्याप धूळ खात पडला आहे. आता आचारसंहितेमुळे नवीन सरकारच या प्रस्तावाबाबत विचार होऊ शकणार असल्याने एसटी महामंडळाने मात्र अशा निमआराम व आरामदायक आसनव्यवस्थेच्या गाडय़ा आपल्या कार्यशाळेतच तयार करण्याच्या नव्या पर्यायाची चाचपणी सुरू केली आहे.
एसटीच्या ‘हिरकणी’ आणि ‘शिवनेरी’ या दोन्ही सेवा प्रवाशांमध्ये प्रचंड प्रसिद्ध आहेत. मात्र या दोन्ही सेवांच्या तिकीट दरांपासून आरामदायक व्यवस्थेत कमालीची तफावत आहे. त्यामुळे ‘हिरकणी’ने प्रवास करण्यास इच्छुक नसलेला आणि ‘शिवनेरी’चे दर परवडणे कठीण असलेला प्रवासी खासगी बसगाडय़ांकडे वळत आहे. अशा प्रवाशांना एसटीकडे आकर्षित करण्यासाठी एसटी महामंडळाने ‘हिरकणी’ आणि ‘शिवनेरी’मध्ये ‘निमआराम’ सेवा सुरू करण्याबाबत विचार चालू केला होता.
या निमआराम गाडय़ा वातानुकुलित नसल्या, तरी त्यातील आसनव्यवस्था हिरकणी गाडय़ांपेक्षा वेगळी असेल. शिवनेरी गाडय़ांमध्ये असलेल्या ‘पुशबॅक सीट्स’ या गाडय़ांमध्ये असतील, असे एसटीने महिनाभरापूर्वीच स्पष्ट केले होते. एसटीच्या ताफ्यात या गाडय़ा विकत घ्याव्यात, यासाठीचा प्रस्ताव एसटी महामंडळाने राज्य सरकारकडे पाठवला होता. मात्र त्याला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. आचारसंहिता लागू झाल्याने नवीन सरकार आल्याशिवाय हा प्रस्ताव मंजूर होणार नाही, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
भारमान खालावले
एसटीचे प्रवासी भारमान दिवसेंदिवस खालावत असताना अशी नवीन सेवा लवकरात लवकर सुरू करण्याचा विचार एसटी करत आहे. त्यासाठी गेल्या आठवडय़ात झालेल्या एसटीच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत या सेवेबाबत चर्चा झाली. सध्याच्या हिरकणी बसगाडय़ांपैकी काही गाडय़ांची आसनव्यवस्था बदलता येईल का, की नवीन गाडय़ांची बांधणी करताना त्यात अशा प्रकारची पुशबॅक आसनव्यवस्था करता येईल, याबाबत या बैठकीत चर्चा झाल्याचे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा