मोठा गाजावाजा करून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन झालेली राज्य परिवहन महामंडळाची ‘बोरिवली-बीकेसी’ ही कॉर्पोरेट शिवनेरी सेवा अखेर बंद करण्याचा निर्णय एसटी प्रशासनाने घेतला. पहिल्या दिवसापासूनच या सेवेला प्रवाशांचा सहवासच लाभला नाही. महिन्याभरानंतर या सेवेचा आढावा घेतला असता सरासरी फक्त सात ते आठ प्रवासी या सेवेचा लाभ घेत असल्याचे लक्षात आले होते. अखेर एसटीने शनिवारपासून या सेवेला पूर्णविराम द्यायचे ठरवले. ही सेवा बंद झाल्याने मोकळ्या वेळेत ठाणे-बोरिवली या मार्गावर चालवली जाणारी व्होल्वो सेवाही बंद झाली आहे. एसटीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विकास खारगे यांनी सप्टेंबर महिन्यात पदभार स्वीकारल्यानंतर ‘कॉर्पोरेट शिवनेरी’ सेवेबद्दल पुनर्विचार करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. तोटय़ात चालणारी ही सेवा बंद करावी, अशी मागणीही विविध कामगार संघटनांनी केली होती.  
‘शीतल’लाही घरघर
नवी मुंबई परिसरातून पुण्याला सुटीच्या दिवशी जाणाऱ्या प्रवाशांसाठी एसटीने वाशी ते स्वारगेट अशी शीतल सेवा सप्टेंबर महिन्यात सुरू केली होती. मात्र या सेवेलाही प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद लाभल्याने ही सेवा बंद करण्यात आली आहे. वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे नाशिक, जुन्नर, नारायणगाव या परिसरातून अनेक लोकांची ये-जा असते. त्यामुळे या मार्गासाठी एखादी गाडी सुरू करावी, अशी प्रवाशांची इच्छा असूनही एसटीने ‘शीतल’ सेवा सुरू करताना या मार्गाऐवजी वाशी-पुणे या मार्गालाच पसंती दिली होती.

Story img Loader