मुंबई : ज्येष्ठ नागरिकांसह समाजातील विविध घटकांना एसटी महामंडळाकडून प्रवासभाड्यात सवलत देण्यात येते. सवलतीचा लाभ घेणाऱ्यांना स्मार्ट कार्ड देण्यात येते. मात्र स्मार्ट कार्डचे काम पाहणाऱ्या कंपनीची मुदत जून २०२२ मध्ये संपुष्टात आली असून एसटी महामंडळाने मुदत वाढवून दिल्यानंतरही कंपनीने याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. परिणामी, प्रवाशांना नवीन स्मार्ट कार्ड मिळू शकलेले नाही. याचा फटका राज्यातील सहा लाख सवलतीचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांना बसला आहे. यापैकी चार लाख १९ हजार २१८ नवीन स्मार्ट कार्ड ज्येष्ठ नागरिकांचे आहेत.

एसटी महामंडळाने १ जून २०१९ पासून स्मार्ट कार्ड योजना सुरू केली. ज्येष्ठ नागरिक,  विद्यार्थी, अंध व्यक्ती, स्वातंत्र्यसैनिक, डायलिसिस  रुग्ण, अपंग, सर्वसाधारण प्रवासी, विविध सेवा पुरस्कारप्राप्त व्यक्तींचा (आदिवासी सेवक पुरस्कार्थी,  डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार्थी, शिव छत्रपती पुरस्कार्थी, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे सन्मान शहीद योजना यासह अन्य) लाभार्थ्यांमध्ये समावेश आहे.

 आतापर्यंत राज्यात एकूण ३९ लाख ८४ हजार ५५४ स्मार्ट कार्डची नोंदणी झाली आहे. यापैकी ३३ लाख ७४ हजार ५६२ स्मार्ट कार्डचे प्रवाशांना वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे ६ लाख ०९ हजार ९९२ नवीन स्मार्ट कार्ड प्रवाशांना मिळालेले नाही. जुलै २०२२ पासून नवीन स्मार्ट कार्डचे काम ठप्पच झाले आहे. हे  कार्ड कंपनीकडून एसटी महामंडळाला वितरित करण्यात येते आणि  महामंडळद्वारे प्रवाशांना उपलब्ध होते. हे काम करणाऱ्या कंत्राटदाराची अंतिम मुदत संपल्याने राज्यातील स्मार्ट कार्डची सर्व कामे ठप्प आहेत. त्याच कंपनीला पुन्हा स्मार्ट कार्डचे काम पाहण्याची विनंती करण्यात आली. अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही. परिणामी, प्रवाशांना नवीन स्मार्ट कार्ड मिळालेले नाही. त्यामुळे अनेक प्रवासी आगार, बस स्थानकात खेटे घालत आहेत.

 सहा लाख ०९ हजार स्मार्ट कार्डधारकांमध्ये चार लाख १९ हजार २१८ जेष्ठ नागरिकांचा समावेश आहे. तसेच एक लाख ६० हजार १४९ विद्यार्थ्यांना हे कार्ड मिळालेले नाहीत. तर दिव्यांगसह अन्य सवलतधारकही यापासून वंचित आहेत.

स्मार्ट कार्डचे काम पाहणाऱ्या कंपनीची मुदत संपली आहे. त्यांनीच हे काम पाहावे असे सांगण्यात आले आहे. त्या कंपनीच्याही काही समस्या आहेत. कंपनीने अद्याप  निर्णय घेतलेला नसून ही समस्या लवकरच सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

– शेखर चन्ने, व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ