रोकडरहित प्रवासासाठी एसटी महामंडळाची स्मार्ट कार्ड योजना सुरू
एसटी प्रवाशांचा प्रवास आता कॅशलेस होणार आहे. एसटी महामंडळाने मंगळवारपासून मुंबई सेन्ट्रल आगारात प्रवाशांसाठी स्मार्ट कार्ड योजना कार्यान्वित केली आहे. त्यामुळे प्रवाशांना प्रवासात रोख रकमेऐवजी स्मार्ट कार्डद्वारे तिकीट मिळवता येणे शक्य होणार आहे. या कार्डचा वापर प्रवाशांना शॉपिंगसाठीही करता येणार असल्याची माहिती महामंडळाने दिली.
शासनाने विविध सामाजिक घटकांना एसटीमधून प्रवासाची सवलत दिली आहे. परंतु बनावट कार्ड वापरून अनेकजण या योजनेचा लाभ घेत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे एसटी महामंडळाने स्मार्ट कार्डधारकांना आधार कार्डशी निगडित असलेली स्मार्ट कार्ड योजना कार्यान्वित करण्याचे ठरवले. त्यावर गेल्या एक ते दीड वर्षांत कामही सुरू होते. अखेर महामंडळाने स्मार्ट कार्ड योजना कार्यान्वित केली आहे. प्रथम मुंबई सेन्ट्रल आगारात त्याचा शुभारंभ करण्यात आला. सवलतधारकांबरोबरच सामान्य प्रवाशांनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे. एसटीचे राज्यात ६५ लाख सवलतधारक असून यात ५० लाख तर ज्येष्ठ नागरिक आहेत.
आधार कार्डशी संलग्न माहिती प्राप्त झाल्यानंतर नावनोंदणी करता येईल व पंधरा दिवसांनी नोंदणी केलेल्या ठिकाणी कार्ड प्राप्त होईल. आगारातील आरक्षण खिडकीवर नागरिकांनी नावनोंदणी करावी. नावनोंदणी करीत असताना स्मार्ट कार्डसाठी ५० रुपये इतके शुल्क आकारण्यात येणार आहे. त्यानंतरच स्मार्ट कार्ड उपलब्ध होईल. प्रवाशांना या कार्डमार्फत तिकीट उपलब्ध होतानाच शॉपिंगही करता येणे शक्य होणार आहे. त्यासाठी पाच हजार रुपयांपर्यंत या कार्डचे रिचार्ज करण्याची सुविधा आहे. या कार्डचा वापर डेबिट कार्डप्रमाणेही करता येणार असल्याचे सांगितले.