सूडबुद्धीने जाणीवपूर्वक बेदरकारपणे एसटी बस चालवून पुण्यात नऊजणांचा बळी घेणारा आणि ३६ जणांच्या गंभीर दुखापतीस कारणीभूत ठरणारा एसटी बसचालक संतोष माने याची फाशीची शिक्षा उच्च न्यायालयाने मंगळवारी कायम ठेवली. मानेने केलेला गुन्हा हा एवढा क्रूर आहे की त्याने समाजमनावर मोठा आघात झाला आहे. त्यामुळेच त्याचे कृत्य अपवादात्मक व दुर्मीळातील दुर्मीळ प्रकारात मोडणारे असून त्यासाठी फाशी हीच शिक्षा योग्य आहे, असे स्पष्ट करीत त्याचे फाशीविरोधातील अपील न्यायालयाने फेटाळून लावले. माने हा मनोरुग्ण असल्याचा दावाही सपशेल खोटा असल्याचे सांगत न्यायालयाने तो फेटाळून लावला.  
आपली मानसिक स्थिती नीट नाही. अपघाताच्या वेळीही ती तशीच होती आणि आपल्यावर त्या अनुषंगाने उपचार सुरू असल्याचा दावा करीत माने याने फाशीच्या शिक्षेला आव्हान दिले होते. त्याचा हा दावा फेटाळून लावत त्याला दोषी ठरविण्याचा सत्र न्यायालयाचा
निर्णय गेल्या २३ जुलै रोजी न्या. विद्यासागर कानडे आणि न्या. प्रमोद कोदे यांच्या खंडपीठाने कायम ठेवला होता. मंगळवारी न्यायालयाने माने याची फाशी कायम करताना कठोरातील कठोर शिक्षा कायम ठेवण्यामागील कारणेही विशद केली.

सरकारी पक्षाचा दावा
माने याला त्याने केलेल्या कृत्याचा कुठलाही पश्चाताप नाही ही बाब सरकारी वकील संदीप शिंदे आणि अतिरिक्त सरकारी वकील माधवी म्हात्रे यांनी मानेच्या अपिलाला विरोध करताना न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. तसेच अपघाताच्या वेळेस माने याची मानसिक स्थिती अगदी व्यवस्थित होती ही सिद्ध करणारी ससून रुग्णालयाची वैद्यकीय कागदपत्रेही त्यांनी सादर केली.  

मानेच्या वकिलांचा युक्तिवाद
माने याच्यावर २०१० पासून मानसिक उपचार सुरू होते आणि मानसिक स्थिती बिघडली असतानाच हा अपघात झाल्याचे त्याचे वकील जयदीप माने यांनी मांडण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी वैद्यकीय कागदपत्रेही सादर केली. एवढेच नव्हे, तर आपल्या हातून काय घडले याची जाणीव झाल्यानंतर त्याला त्याचा पश्चाताप झाल्याचा दावाही त्याच्या वकिलांनी केला.

हा केवळ सेवारत चालकाकडून अनवधानाने घडलेला अपघात नाही तर बसचे अपहरण करून ती सूडबुद्धीने बेदरकारपणे चालवून पादचाऱ्यांना ठार करण्याचा गंभीर गुन्हा आहे. मानेला थांबविण्यासाठी प्रयत्न केले जात असतानाही त्याकडे दुर्लक्ष करून त्याने निष्पापांना चिरडले. तांत्रिक कारणांमुळे बस थांबवता येत नव्हती म्हणून नव्हे तर लोकांना ठार करण्याच्या हेतूनेच केलेले ते कृत्य आहे. अशा प्रकारचे अघोरी आणि अमानवी कृत्य क्षमेस पात्र नाही. या भीषण गुन्ह्य़ाला क्षमा दिली तर  गंभीर गुन्हा करूनही दयाभावामुळे कायद्याच्या हातून निसटू शकते, असा चुकीचा संदेश समाजात जाईल.      – उच्च न्यायालय

Story img Loader