शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी आरक्षित करण्यात आलेल्या एसटी बसगाड्यांच्या भाड्यापोटी एसटी महामंडळाला १० कोटी रुपये उत्पन्न मिळाले असून तत्पूर्वी गणेशोत्सव, आषाढी एकादशीनिमित्त सोडलेल्या जादा एसटी गाड्यांमुळे एसटी महामंडळाच्या तिजोरीत तब्बल ३६ कोटी रुपयांची भर पडली आहे.
एसटी महामंडळाने ६ ते १४ जुलै २०२२ या काळात आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर यात्रेसाठी ४ हजार ५३८ जादा गाड्या सोडण्यात आल्या होत्या. वाखरी येथील रिंगण सोहळ्यासाठीही २०० एसटी बस उपलब्ध केल्या होत्या. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती या सहा प्रदेशांतून गाड्यांचे नियोजन करण्यात आले होते. या जादा बसगाड्यांमधून १५ लाख ३६ हजार १५६ प्रवाशांनी प्रवास केला असून २२ कोटी ५८ लाख १५ हजार रुपये उत्पन्न महामंडळाला मिळाले आहे. त्याचबरोबर ऑगस्टमध्ये गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांची संख्या लक्षात घेऊन महामंडळाने अडीच हजार जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये गट आरक्षणाही उपलब्ध केले होते. मात्र प्रवाशांचा प्रतिसाद पाहता गणेशोत्सवात ४ हजार १४३ जादा गाड्यांचे आरक्षण झाले. तर या बसगाड्यांमधून ६ लाख ७६ हजार ६४६ प्रवाशांनी प्रवास केला. यातून महामंडळाला १३ कोटी ६९ लाख ३४ हजार रुपये उत्पन्न मिळाले.
हेही वाचा- पक्षाला संजय राऊतांसारखा उत्तम प्रवक्ता हवा आहे… आहे का कुणी?
२०१९ मध्ये ३ हजार ५१० जादा बसगाड्या उपलब्ध करण्यात आल्या होत्या. त्यावेळी गणोशोत्सव काळात ५ लाख ३७ हजार ६०३ प्रवाशांनी प्रवास केला होता. त्यावेळी ११ कोटी २७ लाख ९६ हजार रुपये उत्पन्नाची भर महामंडळाच्या तिजोरीत पडली होती. २०१९ च्या तुलनेत २०२२ मध्ये २४ कोटी १३ लाख रुपये अधिक मिळाले आहेत. तर २०१९ आषाढी एकादशीत केलेल्या जादा वाहतुकीतून महामंडळाला २२ कोटी ४८ लाख उत्पन्न मिळाले होती. २०२२ शी तुलना करता यावेळी ९ लाख ५६ हजार रुपये अधिक प्राप्त झाले आहेत.