मुंबई : एसटी महामंडळाच्या जास्तीत जास्त बस प्रदूषणविरहीत इंधनावर चालवण्यासाठी दीड वर्षापूर्वी ५,१५० विद्युत (इलेक्ट्रीक) बस पुरवठा करण्याचे कंत्राट हैदराबाद येथील ‘ईव्हरी ट्रान्स’ कंपनीला देण्यात आले होते. परंतु या कंपनीने आतापर्यंत केवळ २२० बसेसचा पुरवठा केला आहे. यातून एसटीचे १३ रुपये प्रतिकिलोमीटरचे नुकसान होत आहे. करारानुसार या कंपनीने ३१ जानेवारीपर्यंत १,३४५ बस पुरवठा करणे अपेक्षित होते. परंतु पहिल्यापासून वेळेत बस पुरवठा न करणाऱ्या कंपनीचे कंत्राट अखेर रद्द करण्याचा इशाराच एसटी मंडळाने दिला आहे.

राज्याच्या ग्रामीण भागातील प्रवाशांच्या हक्काचे दळणवळणाचे साधन असलेल्या एसटीतील ७५ टक्के बस भंगारात जाण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे एसटीच्या ताफ्यात टप्प्याटप्प्प्याने नवीन बस दाखल करणे क्रमप्राप्त आहे. नोव्हेंबर २०२३ रोजी एसटी महामंडळाने प्रदूषणविरहीत विद्युत इंधनावर चालणाऱ्या ५,१५० बस खरेदी करण्याचा निर्णय घेतला. हे काम हैदराबाद येथील ‘ईव्हरी ट्रान्स प्रा. लि.’ या कंपनीला देण्यात आले होते.

कंत्राट करारनाम्यात २४ महिन्यांत बसपुरवठा आणि एक वर्षात विद्युत पायाभूत सुविद्या उभारल्या जातील, असे नमूद करण्यात आले आहे. करारनाम्यानंतर १६ महिन्यांत ५,१५० पैकी केवळ २२० बस या कंपनीने एसटीच्या ताफ्यात दाखल केलेल्या आहेत. या कंपनीने येत्या दोन महिन्यांत म्हणजे मे महिन्यापर्यंत बसपुरवठा केला नाही तर हे कंत्राट रद्द करण्याचे पाऊल एसटी महामंडळाला उचलावे लागेल, असा अप्रत्यक्ष इशारा एसटी महामंडळाचे अध्यक्ष व परिवहन विभागाचे अतिरिक्त प्रधान सचिव संजय सेठी यांनी दिला आहे.

तारीख पे तारीख…

जानेवारी २०२५ पर्यंत १,८२५ आणि सर्व ५,१५० बस नोव्हेंबर २०२५ पर्यंत पुरवठा करू, असे पत्र कंपनीने दिले आहे. काही दिवसांत या आश्वासनात बदल करून जानेवारीपर्यंत १,३९४ आणि डिसेंबर अखेरपर्यंत सर्व बस देऊ, असे कंपनीने सांगितले. नंतर जानेवारीअखेर १,३४५ बस देऊ शकतो, असे स्पष्ट केले. आता तर चक्क जानेवारी २०२६ पर्यंत सर्व बस पुरवठा करू, असे या कंपनीने सांगून टाकले आहे. या बस लवकर येत नसल्याने एसटीचे दररोज १३ रुपये प्रतिकिलोमीटरचा तोटा होत आहे.

विद्युत इंधनावर एसटीच्या ताफ्यात जास्तीत जास्त बस याव्यात, अशी सर्वांची इच्छा आहे. पण या कंपनीने कराराचा भंग केला. त्यामुळे एसटीचे खूप मोठे नुकसान होत आहे. ही कंपनी मुदतीत विद्युत बस देईल याची खात्री नाही. विश्वासार्हता गमावलेल्या या कंपनीची निविदा रद्द करून एसटीने नव्याने बस खरेदी कराव्यात.- श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस.

Story img Loader