मुंबई : एसटी महामंडळातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना यंदा सरसकट पाच हजार रुपये दिवाळी भेट मिळणार आहे. यासाठी राज्य शासनाकडून ४५ कोटी रुपये निधी एसटी महामंडळाला देण्याचा निर्णय झाला आहे. याआधी प्रत्येक वर्षी एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीत अडीच हजार रुपये आणि अधिकाऱ्यांना पाच हजार रुपये भेट दिली जात होती. दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांना सहा टक्के महागाई भत्ताही मिळणार असून त्याची प्रक्रियाही अंतिम टप्प्यात आहे.
हेही वाचा >>> Aryan Khan Drugs Case: आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील तपासात त्रुटी, एनसीबीच्या अहवालातून खुलासा
दरम्यान, महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी सांगितले की, राज्य शासनाने त्यांच्या कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर महिन्याचे वेतन २१ ऑक्टोबरला अदा करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनाही ऑक्टोबरचे वेतन दिवाळीआधीच देण्याचे आदेश काढण्याची मागणी एसटी महामंडळाकडे केली आहे.
हेही वाचा >>> तुमच्यात आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमध्ये नाराजी आहे का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, “सध्याच्या परिस्थितीत…”
तर महाराष्ट्र एस.टी.कर्मचारी कॉंग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनीही शासनाकडून दिवाळी भेट म्हणून देण्यात आलेली ४५ कोटी रक्कम ही कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्यासारखी असल्याचीही टीका केली आहे. महागाई वाढली असून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे ऑक्टोबरचे वेतन दिवाळीआधी देण्यात येणार असून तशाच प्रकारे वेतन एसटी कर्मचाऱ्यांनाही मिळावे आणि दिवाळीआधी महागाई भत्ताही मिळावा, अशी मागणी असल्याचेही ते म्हणाले.
ऑक्टोबरचे वेतन सणापूर्वी नाही
एसटी अधिकारी, कर्मचाऱ्यांना सरसकट पाच हजार रुपये दिवाळी भेट दिली जाणार असून बुधवारपासून त्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे. मात्र शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांनाही ऑक्टोबरचे वेतन २१ ऑक्टोबरलाच अदा करण्यासंदर्भात कोणताही विचार सध्यातरी नाही, असे एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली. एसटी कर्मचाऱ्यांना वेतन हे प्रत्येक महिन्याच्या सात तारखेला होत असते.