मुंबई : गेल्या अनेक कालावधीपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक मागण्या प्रलंबित आहेत. त्यांची पूर्तता होण्यासाठी एसटी महामंडळातील सर्व कामगार, कर्मचारी ५ मार्च रोजी सर्व आगार, विभागाच्या मुख्यद्वारावर आंदोलन करणार आहेत. या निदर्शने आंदोलनाची दखल एसटी महामंडळ, राज्य सरकारने न घेतल्यास, त्यानंतर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेकडून दिला आहे. परिणामी, एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलनाचा मोठे स्वरूप प्राप्त झाल्यास होळीच्या कालावधीत वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
राज्य परिवहन (एसटी) महामंडळाकडे प्रलंबित असलेली विविध स्वरूपाची थकबाकी एसटी कामगारांना देण्याबाबत वारंवार मागणी करूनही ती मिळत नसल्यामुळे कामगारांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. ती दूर करण्यासाठी व कामगारांना देय असलेल्या वाढीव वेतनाच्या थकबाकीमध्ये खंड पडू नये यासाठी १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२४ या कालावधीची देय होणारी थकबाकी त्वरीत देण्यात यावी. तसेच २०१८ सालापासूनची महागाई भत्याची थकबाकी कामगारांना अदा करण्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे.
ही थकबाकी अद्याप कामगारांना मिळालेली नाही. तसेच घरभाडे भत्त्याचा दर, वेतनवाढीचा दर कमी करण्यात आला आहे. एसटी कामगारांना वाढीव ५० टक्के महागाई भत्ता लागू करण्याबाबत वारंवार मागणी करूनही सुमारे १ वर्षाचा कालावधी उलटून गेलेला असतानाही ५० टक्के महागाई भत्ता कामगारांना लागू केलेला नाही. हा महागाई भत्ता थकबाकीसह कामगारांना मार्च २०२५ च्या वेतनापासून लागू करण्यात यावा, अशी मागणी संघटनेने केली आहे.
मुंबई, ठाणे आणि पालघर विभागातून पुणे मार्गे चालविण्यात येणाऱ्या एसटी बसगाड्यांवर आरटीओने मोठ्याप्रमाणात दंडात्मक कारवाई केली असून त्या रक्कमेची वसुली कामगारांकडून केली जात आहे. ती थांबविण्यात यावी. एसटी चालकांचा दोष नसताना त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. अशा प्रकारची कारवाई करण्यात येऊ नये यासाठी महाव्यवस्थापक (वाहतूक) यांच्यामार्फत संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना देणे आवश्यक आहे. त्या सूचना देण्याचेही प्रशासनाने मान्य केले होते. मात्र, तरीही दंडात्मक कारवाई अद्याप होत आहे. रक्कम कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कमी केली जात आहे. त्याबाबत त्वरीत दखल घेऊन कर्मचाऱ्यांच्या वेतनातून अशी होणारी कपात थांबविण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेकडून करण्यात आली आहे.