मुंबई : महिला, ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणाऱ्या सवलतींमुळे एसटी महामंडळाचा तोटा वाढल्याचे विधान परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी केल्याने टीका होऊ लागली असतानाच यंदाच्या आर्थिक वर्षाच्या १० महिन्यांत विविध सवलतींमुळे एसटी महामंडळाला ६४० कोटींचा तोटा सहन करावा लागला आहे.

एसटी महामंडळ सतत तोट्यातच आहे. या आर्थिक वर्षात मागील दहा महिन्यांत ऑगस्ट महिना वगळता प्रत्येक महिन्यात तोटाच झाला आहे. राज्य सरकारकडून १७ मार्च २०२३ पासून महिला सन्मान योजनेंतर्गत सवलतींमुळे एसटीवर ६४० कोटींचा बोजा

महिलांना बसमधून ५० टक्के सवलतीत प्रवास सुरू करण्यात आला. २०२३पासून आतापर्यंत ११५.१७ कोटी महिलांनी (एका फेरीत किती महिलांनी प्रवास केला त्या आधारे ही संख्या मोजली जाते) या सवलतीचा लाभ घेतला आहे. या सवलतींचा खर्च ३,५२७.७४ कोटी असून याची प्रतिपूर्ती राज्य सरकारकडून करण्यात येते. २०२४-२५ या आर्थिक वर्षात आतापर्यंत ५३.९१ कोटी महिलांनी एसटीने मोफत प्रवास केला असून १५०९ कोटी रुपयांच्या सवलतीचा लाभ घेतला आहे. प्रत्येक महिन्याला साधारण २ कोटी महिला या एसटी सवलतीचा लाभ घेत असतात. ही सवलतीच्या रक्कम महिन्याला १२५ ते १५० कोटी रुपये इतकी आहे.

ज्येष्ठ नागरिकांसाठीची सवलत २६ ऑगस्ट २०२२ पासून सुरू करण्यात आली. आतापर्यंत ५२.१५ कोटी ज्येष्ठ नागरिकांनी या सवलतीचा लाभ घेतला असून यासाठी २,६८२.३२ कोटींच्या खर्चाची प्रतिपूर्ती सरकारकडून करण्यात आली आहे. या आर्थिक वर्षात २१.८० कोटी ज्येष्ठ नागरिकांनी या सवलतीचा लाभ घेतला असून याचे सवलतमूल्य ११२६.५६ कोटी इतके आहे. ही सवलतीची रक्कम दर महिन्याला १००-१२० कोटी इतकी आहे.

या आर्थिक वर्षात आतापर्यंत एसटी महामंडळाला केवळ ऑगस्ट महिन्यात झालेला २२ कोटींचा नफा वगळता प्रत्येक महिन्याला तोट्याचा सामना करावा लागला आहे. यामध्ये सर्वाधिक तोटा हा सप्टेंबर महिन्यात १३१ कोटी तर ऑक्टोबर महिन्यात १६५ कोटी इतका झाला आहे. प्रतिपूर्तीपोटी सरकारकडून महामंडळाला ३८३५ कोटी मिळाले आहेत.

टोलमध्ये सवलतीची मागणी

एसटी महामंडळाकडून टोलमध्ये सवलतीची मागणी सरकारकडे करण्यात येत आहे. २०४ कोटींचा पथकर जात असल्याने त्यात सवलत मिळाल्यास एसटीचा तोटा कमी करण्यास मदत होणार आहे.

एसटी महामंडळाला तोट्यातून काढण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. यात पहिल्यांदा जाहिरातीचे उत्पन्न वाढविण्यावर भर दिला जात आहे. त्याचप्रमाणे अनावश्यक खर्चात कपात करण्यावर भर देण्यात येत आहे. राज्य सरकार तसेच अन्य देण्यांपोटी साडेपाच हजार कोटींची देणी येणे आवश्यक आहे. वित्त मंत्री अजित पवार यांच्याकडे या अर्थसंकल्पात ही देणी देण्याबाबत विनंती करण्यात आली आहे. – प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री

एसटीचा तोटा कसा?

८५१४ कोटी : एसटीचे मागील दहा महिन्यांतील उत्पन्न

४५७८ कोटी : वेतन खर्च

३०८९ कोटी : डिझेल खर्च

५७२ कोटी : सुटे भाग

२०४ कोटी : पथकर (टोल)

१८६.३२ कोटी : भाडेतत्त्वावरील बससाठी खर्च

९१५४ कोटी : एकूण खर्च

(एकूण उत्पन्न आणि खर्चातील तफावतीपोटी ६४० कोटींचा तोटा)

Story img Loader