एस.टी. महामंडळाने सहा वर्षांपूर्वी राज्यातील १३ शहरांमध्ये विमानतळाच्या धर्तीवर बस तळ (बस पोर्ट) उभारण्याचा निर्णय घेतला होता. या प्रकल्पाची मुहूर्तमेढ पनवेलमध्ये रोवण्यात येणार होती. मात्र अद्याप पनवेलमध्ये बस तळाची एकही वीट उभी राहू शकलेली नाही. या बस तळाचा आराखडा पनवेल महानगरपालिकेला सादर करण्यात आला आहे. मात्र त्यावर अद्यापही निर्णय घेण्यात आलेला नाही. परिणामी, प्रवाशांना दर्जेदार बस तळ उपलब्ध होऊ शकलेली नाहीत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंत्तीनिमित्त २३ जानेवारी २०१६ रोजी माजी परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी महाराष्ट्रातील प्रमुख अशा १५ शहरातील बस स्थानकांमध्ये विमानतळाच्या धर्तीवर दर्जेदार असे बस तळ उभारण्याची घोषणा केली होती. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते याच कार्यक्रमात एसटीच्या पनवेल येथील बस तळाचे भूमिपूजनही करण्यात आले होते. कालांतराने या बस तळाची संख्या कमी करण्यात आली आणि १३ बस तळांची उभारणी करण्यावर शिक्कामोर्तब झाले. भिवंडी, पनवेल, नाशिक महामार्ग, औरंगाबाद, बोरिवली, धुळे, नांदेड, कोल्हापूर, सांगली, अकोला, नागपूर, शिवाजीनगर (पुणे), जळगाव येथील स्थानकांमध्ये बस तळ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पनवेल बस तळाच्या उभारणीला सुरुवात करून टप्प्याटप्प्याने अन्य ठिकाणी हा प्रकल्प राबविण्याचा महामंडळाचा मानस होता. मात्र पनवेल बस तळाचे भूमिपूजन झाल्यानंतरही त्याची एकही विट रचली गेलेली नाही. ‘बांधा-वापरा-हस्तांतरित करा’ या तत्वावर या बस तळांची उभारणी करण्यात येणार असून अटी व शर्तींमध्ये वारंवार करण्यात येणाऱ्या बदलांमुळे हा प्रकल्प रखडला. त्यातच मार्च २०२० पासून वाढलेला करोनाचा संसर्ग, निर्बंध यामुळेही आणखी विलंब झाला.

पनवेल बस तळाचे काम हाती घेण्यात आले आहे. या बस तळाचा आराखडा पनवेल महानगरपालिकेकडे मंजुरीसाठा सादर करण्यात आला आहे. या तळाची उभारणी ‘बांधा – वापरा – हस्तांतरित करा’ तत्वावर करण्यात येणार आहे. मात्र याबाबतच्या धोरणात काही बदल करण्यात येत आहेत. त्याला नव्या सरकारकडून मंजुरी घेण्याची गरज आहे, असे एस. टी. महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी सांगितले.
बस तळांमध्ये या सुविधा असतील

मोठ्या प्रमाणात सुटणाऱ्या बसगाड्या, रेस्टॉरेंट, प्रवाशांसाठी प्रतीक्षालय, वाहनतळ, प्रवाशांना बसण्यासाठी उत्तम सोय यासह अनेक सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करण्यासाठी बस तळाची उभारणी करण्यात येणार आहे. पण अद्यापही त्याला मुहूर्त सापडलेला नाही.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: St first bus stand in panvel is awaiting approval mumbai print news amy