मुंबई: वेळेत उपचार न मिळाल्याने सेंट जॉर्जेस रुग्णालयात कार्यरत असलेल्या अनिश चौहान (३२) या कर्मचाऱ्याला जीव गमवावा लागल्याची घटना बुधवारी रात्री घडली. त्यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी व रुग्णालयातील त्याच्या सहकाऱ्यांनी गोंधळ घालत डॉक्टरांवर कारवाईची मागणी केली. या प्रकरणाची दखल घेऊन रुग्णालयातील तीन डॉक्टरांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच या प्रकरणाची सखाेल चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली आहे.
सेंट जॉर्जेस रुग्णालयात लघुशस्त्रक्रियागृहामध्ये कार्यरत असलेला अनिश चौहान यांना आकडी आल्याने ते खाली पडून त्यांच्या डोक्याला मार लागला. त्यामुळे रक्तस्राव झाल्याने त्यांना सायंकाळी ५ वाजून ५४ मिनिटांनी सेंट जॉर्जेस रुग्णालयाच्या आपत्कालिन विभागामध्ये आणण्यात आले. त्यावेळी रुग्णालयात वरिष्ठ डॉक्टर उपलब्ध नसल्याने आंतरवासिता सेवेतील डॉक्टरांनी तपासल्यानंतर साधारण सव्वा सहा वाजता तो क्ष किरण काढण्यासाठी गेला. त्यानंतर डोक्याला मार लागलेल्या ठिकाणी टाके घालण्यासाठी वरिष्ठ डॉक्टर रुग्णालयात उपलब्ध नसल्याने टाके घालण्यास विलंब झाला. त्यांना ७ वाजून ४५ मिनिटांनी लघुशस्त्रक्रियागृहामध्ये टाके घालण्यासाठी नेण्यात आले. त्यानंतर ९ वाजता त्यांचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी घोषित केले असे त्यांचे बंधू भाऊ योगेश वाघेला यांनी सांगितले. अनिश यांचा मृत्यू कशामुळे झाले हे सुद्धा डॉक्टरांनी सांगितले नाही. त्यामुळे नातेवाईक व त्यांच्यासह कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. अनिश यांना वेळेवर उपचार न मिळाल्यानेच त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांकडून करण्यात आला.
हेही वाचा >>>Mumbai crime news: अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून ॲसिड फेकण्याची धमकी
नातेवाईकांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे जे.जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी प्राथमिक समिती स्थापना केली आहे. या समितीच्या अहवालानुसार अनिश चौहान यांना टाके घालत असताना त्यांना पुन्हा आकडी येऊन ते बेशुद्ध झाले. डॉक्टरांनी त्यांना सीपीआर देण्याचा प्रयत्न केला. मात्र यश न आल्याने त्यांना रात्री ८ वाजून ५० मिनिटांनी मृत घोषित करण्यात आले. या प्रकरणी रुग्णालयातील अपघात वैद्यकीय अधिकारी डॉ. नबीला जबील, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. गोकुळ भोळे आणि डॉ. भूषण वानखेडे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
हेही वाचा >>>रुईया महाविद्यालयात वर्ग सुरू असताना पंखा पडला; सुदैवाने विद्यार्थी बचावले
सखोल चौकशीसाठी समिती गठीत
मृत झालेल्या कर्मचाऱ्याच्या नातेवाईकांनी गोंधळ घातल्याने या प्रकरणाची प्राथमिक स्तरावर चौकशी करण्यात आली असली तरी याची सखोल चौकशी व्हावी असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आदेश दिले. त्यामुळे जे. जे. रुग्णालयातील शल्यचिकित्सा विभाग प्रमुख डॉ. अजय भंडारवार, औषध वैद्यक शास्त्र विभाग प्रमुख डॉ. विद्या नागर आणि न्यायवैद्यक शास्त्र विभाग प्रमुख तथा जी. टी. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भालचंद्र चिखलकर यांची समिती नेमण्यात आली आहे. या समितीच्या अहवालाच्या आधारे दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
चार कर्मचाऱ्यांचा मृत्यू
सेंट जॉर्जेस रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मागील काही दिवसांत चार कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे, असा आरोप अनिश चौहान यांच्या कुटुंबीयांनी केला. जानेवारीतही डॉक्टरांनी केलेल्या दुर्लक्षामुळे अतिदक्षता विभागाबाहेर एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याचा आरोप चौहान यांच्या नातेवाईकांनी केला.
चौकशीमध्ये कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी या प्रकरणी दोषी असलेल्या तिन्ही डॉक्टरांना तातडीने निलंबित करण्यात आले आहे.- राहुल नार्वेकर, विधानसभा अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य
रुग्णालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर उपचार करण्याकडे डॉक्टर दुर्लक्ष करत असतील तर, सर्वसामान्य नागरिकांना कसे उपचार मिळत असतील याचा विचारच न केलेला बरा.- योगेश वाघेला ( मृत अनिश चौहान यांचे बंधू)