लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई: आर्थिकदृष्ट्या दुर्बल, गरीब घटकातील रुग्णांना माफक दरात रक्तशुद्धीकरणाची (डायलिसिस) सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी सेंट जॉर्जेस रुग्णालयामध्ये रक्तशुद्धीकरण केंद्र सुरू करण्यात येत आहे. या केंद्राचा लाभ रुग्णालयात दाखल रुग्णांसोबतच बाहेरील रुग्णांना होणार आहे. त्यामुळे रक्तशुद्धीकरण केंद्रांवर होणारी गर्दी लक्षात घेऊन या सुविधेची तीव्र आवश्यकता असलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील रुग्णांना प्राधान्य मिळावे यासाठी मार्गदर्शक तत्त्वे आखण्यात येणार आहेत. त्यासाठी जे. जे. रुग्णालयाकडून नऊ सदस्य समिती स्थापन करण्यात येणार आहे.
मुंबईतील जे. जे. रुग्णालयामध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी तेथेच रक्तशुद्धीकरण केंद्र आहे. पण या केंद्राचा लाभ रुग्णालयाबाहेरील रुग्णांना होत नाही. त्यामुळे सर्वसामान्यांना खासगी रक्तशुद्धीकरण केंद्र किंवा सामाजिक संस्थांकडून चालविण्यात येणाऱ्या रक्तशुद्धीकरण केंद्रावर जावे लागते. या केंद्रांवर मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने रुग्णांना बराच वेळ ताटकळावे लागते. ही बाब लक्षात घेऊन सेंट जॉर्ज रुग्णालयामध्ये रक्तशुद्धीकरण केंद्र सुरू करण्याची इच्छा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केली होती. त्यानुसार सेंट जॉर्ज रुग्णालयामध्ये १२ खाटांचे रक्तशुद्धीकरण केंद्र सुरू करण्यात येत आहे.
करोनाकाळात रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांपैकी रक्तशुद्धीकरणाची आवश्यकता असलेल्यांसाठी नऊ यंत्रे आणण्यात आली होती. मात्र ही यंत्रे बंद राहू नयेत आणि त्याचा सर्वसामान्य नागरिकांना लाभ व्हावा या उद्देशाने सेंट जॉर्जेस रुग्णालयामध्ये रक्तशुद्धीकरण केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या केंद्रासाठी जीवनज्योती सामाजिक संस्थेकडून तीन रक्तशुद्धीकरणाची यंत्रे उपलब्ध करण्यात आल्याने १२ खाटांचे रक्तशुद्धीकरण केंद्र सुरू करण्यात येत आहे. या केंद्रामध्ये रुग्णांना माफक दरात रक्तशुद्धीकरणाची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे केंद्रावर गर्दी होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा… मुंबई: मोटारगाडी चालकाला टेम्पोखाली चिरडले; टेम्पोचालक अटकेत
रक्तशुद्धीकरण केंद्रावरील गर्दी टाळणे, नियमित रक्तशुद्धीकरण होत असलेल्या रुग्णाला कायम सुविधा उपलब्ध व्हावी, तीव्र आवश्यकता असलेले रुग्ण, गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील रुग्णांना प्राधान्य मिळावे यासाठी मार्गदर्शक तत्त्वे आखण्याचा निर्णय रुग्णालय प्रशासनाने घेतला आहे. यासाठी रुग्णालयातील डॉक्टर व वरिष्ठ अधिकारी, रुग्णालयातील समाजसेवक, खासगी समाजसेवक यांचा समावेश असलेली समिती स्थापन करण्यात येणार आहे. ही समिती रक्तशुद्धीकरणासाठीचे दर निश्चित करणे आणि सर्वसामान्यांना रक्तशुद्धीकरण केंद्राचा लाभ व्हावा यादृष्टीने मार्गदर्शक तत्त्वे आखणार असल्याची माहिती जे.जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी दिली.
“रक्तशुद्धीकरणासाठी एका रुग्णाला साधारणपणे दोन ते तीन तास लागतात. त्यामुळे १२ खाटांचे हे केंद्र सुरू झाल्यानंतर दिवसाला ४० ते ५० रुग्णांना रक्तशुद्धीकरण केंद्राचा लाभ घेता येणार आहे. या केंद्रामध्ये सेंट जॉर्जेस रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांबरोबरच बाह्य रुग्णांनाही माफक दरात रक्तशुद्धीकरण करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.” – डॉ. विनायक सावर्डेकर, वैद्यकीय अधिक्षक, सेंट जॉर्जेस रुग्णालय