एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना भरघोस वेतनवाढ देण्याच्या घोषणेमुळे महामंडळावर वर्षांला ४२४ कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. तो कसा दूर करायचा यावर विचार करण्यासाठी मंगळवारी अधिकाऱ्यांची विशेष बैठक बोलाविण्यात आली आहे. प्रवासी वाढविणे, काटकसर करणे या नियमित उपाययोजनांबरोबरच एसटीच्या कार्यशाळांमधील कर्मचाऱ्यांची उत्पादनक्षमता वाढविणे, मिडी बसेसची संख्या वाढविणे यावरही भर देण्यात येणार आहे.
पगारवाढीमुळे कनिष्ठ कर्मचाऱ्यांना नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणेच भत्ते मिळणार आहेत. हा करार १ एप्रिल २०१२ पासून ३१ मार्च २०१६ अशा चार वर्षांंसाठी होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महामंडळाच्या वतीने सादर करण्यात आलेला प्रस्ताव हा केवळ १२४४ कोटी रुपयांचा होता. यामध्ये नियमित कर्मचाऱ्यांना आठ टक्के वेतनवाढ, कनिष्ठ कर्मचाऱ्यांना किमान वेतनात वाढ सुचविण्यात आली होती. मात्र राज्य शासनाने ४२४ कोटी रुपये वाढवून देत कनिष्ठ कर्मचाऱ्यांनाही नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे पूर्ण भत्ते मिळतील, अशी व्यवस्था केली. नियमित कर्मचाऱ्यांनाही १० टक्के वाढ मिळणार आहे. त्याचप्रमाणे नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणेच कनिष्ठ कर्मचाऱ्यांनाही पूर्ण भत्ते देण्यात यावेत असे शासनाने सुचविले. त्यामुळे नियमित आणि कनिष्ठ कर्मचारी यांच्यातील भत्त्यामध्ये कोणतीही तफावत राहणार नाही. कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत राज्य शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार केल्यामुळे महामंडळाचा प्रस्ताव १२४४ वरून थेट १६६८ कोटीवर गेला आहे. ४२४ कोटी रुपयांचा वाढीव बोजा हा प्रवासी भाडे न वाढविता कसा कमी करता येईल यासाठी महामंडळ विविध उपाय योजणार असल्याचे सांगण्यात येते.
महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी काटकसर, प्रवासी वाढवा अभियान या नियमित उपाययोजनांबरोबरच दापोडी, चिखलठाणा आणि नागपूर या तीन कार्यशाळांची उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी विशेष उपाय योजण्यात येणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, भाडेवाढीमुळे प्रवाशांची संख्या कमी होणे महामंडळाला परवडणारे नाही. त्याऐवजी प्रवासी वाढविण्याची मोहीम जास्तीत जास्त दिवस राबविणे आवश्यक आहे. महामंडळाच्या अनेक अनावश्यक बाबींमध्ये कपात करण्यात येणार असून त्यात अधिकाऱ्यांच्या वाहनांचा अतिरिक्त वापर, कार्यालयांमधील वीजेवर निर्बंध आदी उपाय करण्यात येतील.