एसटीचे वाहक प्रवाशांच्या मोबाइलवर संपर्क साधणार
‘नमस्कार, मी कंडक्टर अमुक अमुक पुणे-मुंबई शिवनेरी गाडीतून बोलतोय.. साहेब, गाडी स्वारगेटहून निघाली आहे, अध्र्या तासात चांदणी चौकात पोहोचेल..’ चांदणी चौकात मुंबईला जाणाऱ्या शिवनेरीसाठी तिकीट आरक्षण करून थांबणाऱ्या प्रवाशांच्या मोबाइलवर लवकरच असा फोन येणार आहे.
खासगी वाहतूकदारांशी स्पर्धा करण्यासाठी एसटी महामंडळ आता प्रवाशांना अत्याधुनिक सेवा देणार आहे. एसटीच्या नियोजित थांब्यांवरून बस पकडणाऱ्या प्रवाशांना बसचा ठावठिकाणा कळावा, यासाठी वाहकाकडूनच प्रवाशांशी संपर्क साधला जाणार आहे. विशेष म्हणजे ऑनलाइन तिकीट काढणाऱ्या प्रवाशांनाही वाहकाचे नाव आणि त्याचा संपर्क क्रमांक देण्यात येणार आहे. असा प्रस्ताव विचाराधीन असल्याची माहिती एसटीतील सूत्रांनी दिली.
एसटीचे तिकीट ऑनलाइन काढणाऱ्या प्रवाशांना आरक्षित तिकीट लघुसंदेशाद्वारे (एसएमएस) पाठवले जाते. तसेच बस सुटण्याच्या तासभर आधी माहिती दिली जाते. आता यात बदल करत तासभर आधी येणाऱ्या लघुसंदेशामध्ये गाडीचा क्रमांक, वाहकाचे नाव आणि संपर्क क्रमांक प्रवाशांना देण्याचा विचार महामंडळामध्ये सुरू आहे. मुख्य स्थानकातून बस सुटण्याआधी वाहक इतर थांब्यांवरून ती बस पकडणाऱ्या प्रवाशांशी संपर्क साधून त्यांना तशी माहिती देणार आहे. तसेच एका थांब्यावरून बस निघाल्यावर पुढील थांब्यावरील प्रवाशांनाही वाहकाकडून सूचना देण्यात येईल.
बस थांबवण्याची विनंती करता येणार
अनेकदा प्रवाशांना पोहोचायला उशीर झाल्याने बस सुटण्याचे प्रकार घडतात. बसच्या नियोजित वेळेच्या पाच-दहा मिनिटे उशिरा प्रवासी पोहोचू शकणार असतील, तर अशा वेळी प्रवासी वाहकाशी संपर्क साधून वाहकाला बस थांबवण्याची विनंती करू शकतात. विशेष म्हणजे या सेवेमुळे कोणतीही माहिती न मिळाल्याने मधल्या थांब्यांवर खोळंबून राहणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळेल, असेही एसटीतील सूत्रांनी स्पष्ट केले.