मुंबई : राज्य परिवहन महामंडळाचे (एसटी) उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने जारदार हालचाली सुरू असून त्याचाच एक भाग म्हणून जास्तीत जास्त उत्पन्न मिळविणाऱ्या चालक व वाहकांना एसटीतर्फे रोख प्रोत्साहन भत्ता देऊन गौरविण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक फेरीच्या उत्पन्नाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात येणार असून निश्चित उत्पन्नाच्या तुलनेत अतिरिक्त उत्पन्न मिळविणाऱ्या चालक – वाहकांना त्याच्या २० टक्के रक्कम प्रोत्साहन भत्ता म्हणून देण्यात येणार आहे. ही रक्कम चालक-वाहकांना सम प्रमाणात वाटण्यात येणार असून आगारात परतल्यानंतर त्याच दिवशी ही रक्कम त्यांना रोख स्वरूपात देण्यात येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : मुंबई :मुख्यमंत्र्यांनी निधी जाहीर केला, पण एसटीला मिळालाच नाही

एसटी महामंडळाने आपले उत्पन्न वाढावे म्हणून विविध उपयोजना व अभिनव उपक्रम हाती घेतले आहेत. ‘प्रवासी राजा दिन’, ‘कामगार पालक दिन’ यांसारखे उपक्रम राबवून प्रवाशांच्या व कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे आहे. तसेच प्रत्यक्ष प्रवासात प्रवाशांना अडचण आल्यास मदत मिळावी म्हणून प्रत्येक बसमध्ये आगार प्रमुखांचे दूरध्वनी क्रमांक प्रदर्शित करण्यात आले आहेत. याबरोबरच तोट्यातील आगारांना मार्गदर्शन करण्यासाठी पालक अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. इंधन बचतीसाठी चालक व यांत्रिक कर्मचाऱ्यांचे समुपदेशन करण्यात येत आहे. शालेय विद्यार्थ्यांना शाळेत जाऊन बस पासचे वितरण करण्यात येत आहे. या सर्व उपाययोजनांमुळे एसटी महामंडळाने ऑगस्ट २०२४ मध्ये १६ कोटी ८६ लाख, ६१ हजार रुपये नफा मिळवला आहे. उत्पन्न वाढीत सातत्य राहण्यासाठी चालक-वाहक हा घटक अत्यंत महत्त्वाचा असून त्यांनी चांगली कामगिरी करावी त्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळणे अत्यंत आवश्यक आहे. ही बाब विचारात घेऊन महामंडळाने प्रायोगिक तत्त्वावर एक महिन्यासाठी वाढीव उत्पन्नावर आधारित प्रोत्साहन भत्ता योजना सुरू केली आहे. विशेष म्हणजे, प्रवासी तक्रार, प्रवाशांसोबत केलेली गैरवर्तणूक अथवा उत्पन्न वाढीसाठी अवैध मार्गाचा वापर केल्यास संबंधित चालक – वाहकांना प्रोत्साहन भत्ता मिळणार नाही. त्यामुळे योग्य कामगिरी करणाऱ्या चालक-वाहकांना रोख स्वरुपात प्रोत्साहन भत्ता देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. या योजनेस चांगला प्रतिसाद मिळाल्यास ती पुढे चालू ठेवण्याबाबतही निर्णय घेण्यात येईल, असे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: St mahamandal to give incentive to st bus driver and conductor for their performance mumbai print news css