मुंबई : राज्य परिवहन (एसटी) कर्मचाऱ्यांच्या विविध आर्थिक मागण्या प्रलंबित आहेत. या मागण्यांची पूर्तता व्हावी यासाठी एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांनी बुधवारी राज्यातील सर्व आगार, विभागाच्या मुख्यद्वारावर आंदोलन केले. या आंदोलनाची दखल एसटी महामंडळ, राज्य सरकारने न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेने दिला होता. त्यामुळे येत्या होळीदरम्यान कर्मचाऱ्यांचे मोठे आंदोलन सुरू झाल्यास बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

एसटी कामगारांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता, घरभाडे भत्ता व वार्षिक वेतनवाढीचा दर लागू आहे. महागाई भत्याची २०१८ सालापासून थकबाकी प्रलंबित आहे. न्यायालयाने थकबाकी देण्याबाबतचा निर्णय दिल्यानंतरही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. आता शासकीय कर्मचाऱ्यांना जुलै २०२४ पासून महागाई भत्याचा दर ५३ टक्के लागू केला असून महागाई भत्ता थकबाकी फेब्रुवारी २०२५ देय मार्च २०२५ च्या वेतनात देण्यात आली आहे. मात्र एसटी कामगारांना महागाई भत्ता अद्याप ४६ टक्केच दिला जात आहे. त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे ५३ टक्के महागाई भत्ता एसटी कामगारांना थकबाकीसह लागू करण्यात यावा. तसेच घरभाडे भत्ता व वार्षिक वेतनवाढीची थकबाकी एप्रिल २०१६ ते ऑक्टोबर २०२१ पर्यंत प्रलंबित आहे. ती मिळणे आवश्यक आहे, असे महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेद्वारे सांगण्यात आले. तसेच भविष्य निर्वाह निधीची उचल वेळेवर द्या, जाचक शिस्त व आवेदन कार्यपध्दती रद्द करा, प्रवाशी भाड्यामध्ये केलेल्या भावाची अंमलबजावणी करताना पूर्वीप्रमाणेच पाचच्या पटीत वाढ करा, आरटीओ विभागाकडून चालकाचा दोष नसताना केलेली दंडात्मक कारवाई रद्द करा, असे महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी सांगितले.

महामंडळाची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर थकबाकीबाबत महामंडळ निर्णय घेईल, असे प्रशासनाने लेखी पत्राव्दारे संघटनेला कळविले आहे. मात्र संघटनेचा त्यास ठाम विरोध असून एसटीची अशी आर्थिक स्थिती निर्माण होण्यास कामगार जबाबदार नाहीत. कामगारांची देय थकबाकी, प्रलंबित महागाई भत्याची थकबाकी, घरभाडे भत्याची थकबाकी, वार्षिक वेतनवाढीची थकबाकी व वाढीव वेतनाचा हप्ता कपात न करता तसाच पुढे सुरू ठेवावा. या व प्रशासकीय पातळीवर मान्य केलेल्या महत्त्वपूर्ण बाबींची पूर्तता न झाल्यास पुढील काही दिवसांत तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे संदीप शिंदे यांनी सांगितले

Story img Loader