करोनाच्या संकटामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात कसे जायचे, असा प्रश्न सतावणाऱ्या मुंबईसह इतर शहरांतील कोकणवासीयांना राज्य सरकारने दिलासा दिला आहे. कोकणात जाण्यासाठी एसटीची बससेवा उपलब्ध करून दिली जाईल, असे परिवहनमंत्री अनिल परब यांनी सोमवारी जाहीर केले.

गणेशोत्सवासाठी कोकणात जाता येणार की नाही, असा प्रश्न मुंबई आणि परिसरात राहणाऱ्या लाखो कोकणवासीयांना पडला आहे. करोनामुळे गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा आणि कोकणातील गावांतील दक्षता समित्यांनी याबाबत प्रशासनाला मदत करावी, असा निर्णय आधीच घेण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर अनिल परब यांनी कोकणात जाण्यासाठी एसटी बसची व्यवस्था करण्याबाबत अधिकाऱ्यांची बैठक घेतली. कोकणात सरसकट सर्वाना जाता येणार नाही. करोनामुळे कोकणात जाणाऱ्यांची फार गर्दी होणार नाही, याची खबरदारी घेतली जाईल, हे स्पष्ट आहे. त्यामुळे कोकणात जाण्याची परवानगी मिळेल, अशांसाठी बसची व्यवस्था करण्याची तयारी राज्य परिवहन विभागाने केली आहे. मुंबई आणि परिसरातून तसेच पुणे व इतर भागांतून एसटी बसची सेवा देण्यात येईल, असे अनिल परब यांनी स्पष्ट केले.

नियम, अटींची प्रतीक्षा

किती बस सोडणार, एका बसमध्ये किती प्रवासी असतील याबाबतचे नियम-अटी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंजुरीनंतर जाहीर करण्यात येतील, असे अनिल परब यांनी स्पष्ट केले. अनेकांची घरे वर्षभर बंद असतात. केवळ गणेशोत्सवात ते गावाला जातात. त्यांच्यासाठी कशी सोय करायची, याबाबतही निर्णय घेण्यात येईल, असे परब यांनी सांगितले.

Story img Loader